मटक्याला अटकाव

0
277

कांदोळीत ‘मुंबई’ मटक्याचा आकडा काढण्यासाठी जमलेल्या २९ जणांच्या मुसक्या एका अनपेक्षित कारवाईत गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने नुकत्याच आवळल्या. या कारवाईमुळे मुंबई मटक्याचा त्या दिवसाचा आकडा निघू शकला नाही आणि त्याचा व्यवहार ठप्प होण्याची अभूतपूर्व घटना घडली. पण एकीकडे ही पोलिसांची कौतुकास्पद कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील मटका अड्डे बिनदिक्कत चालू असल्याचे पाहायला मिळते आहे. हे काय गौडबंगाल आहे? हे मटका अड्डे राजरोस सुरू आहेत ते कोणाला नियमित हप्ता पोहोचवला जातो म्हणून? कांदोळीतील कारवाईची शेखी मिरवण्यापूर्वी पोलिसांनी आधी याचे उत्तर दिले पाहिजे. मटक्याप्रती स्थानिक राजकारण्यांना कमालीची सहानुभूती वेळोवेळी दिसत आलेली आहे आणि काही राजकारणीच गोव्यातील मटका किंग असल्याची वदंता आहे. या परिस्थितीत या कारवाईचे खंबीर पाऊल पोलिसांनी का उचलले असेल याविषयी काही शंका मात्र जरूर उपस्थित होतात! कांदोळीतील कारवाई कोणी का करविली अथवा ती व्यावसायिक दुष्मनीतून तर झालेली नाही ना असेही प्रश्न जनतेला पडणे स्वाभाविक आहे. मटक्याच्या दुनियेमध्ये अशा प्रकारची पराकोटीची व्यावसायिक दुष्मनी नेहमीच चालत आलेली आहे. अगदी मुंबई नगरीमध्ये मटकारूपी हा अजब व्यवसाय सुरू करणार्‍या रतन खत्रीपासूनचा इतिहास तपासला तर तो एकमेकांच्या रक्ताने डागाळल्याचेच दिसून येते. काही वर्षांपूर्वी मटका किंग सुरेश भगत अलीबागच्या कोर्टातून परत मुंबईला जात असताना त्याच्या स्कॉर्पिओ जीपवर मालट्रक आदळवून त्याची त्याच्या साथीदारांसह व अंगरक्षकांसह क्रूरपणे हत्या झाली होती. पुढे तपासात जे आढळले ते अधिक धक्कादायक होते. या सुरेश भगतची घटस्फोटित पत्नी जया भगत आणि मुलगा हितेश यांनीच त्याचा व्यवसाय बळकावण्यासाठी गवळी टोळीतील एकाला पंचेचाळीस लाखांची ही सुपारी दिली होती. मटक्याचा इतिहास मोठा रंजक आहे. न्यूयॉर्कच्या कॉटन एक्स्चेंजचे तो व्यवहार रोज खुलताना आणि बंद होतानाचे भाव पूर्वी मुंबईत टेलिप्रिंटरवरून कळवले जायचे. त्याविषयी असलेल्या स्थानिक व्यापार्‍यांतील उत्सुकतेमुळे ही अनोखी सट्टेबाजी रतन खत्रीच्या कल्पक डोक्यातून सुरू झाली. बघता बघता मुंबईत त्या काळी भरभराटीला असलेल्या गिरणी कामगारांमध्ये हा नशिबावर आधारित खेळ प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यासरशी त्याची उलाढालही कोट्यवधींच्या घरात गेली. साहजिकच मुंबईच्या गुन्हेगारी जगताने त्यात शिरकाव केला आणि एकीकडे खत्री, दुसरीकडे कल्याणजी भगत वगैरेंनी या धंद्यात बस्तान बसवत हजारो एजंट तैनात केले. अगदी सुरवातीच्या काळी मातीच्या मडक्यात चिठ्‌ठ्या टाकून अंदाजे आकडा काढला जात असल्याने या सट्टेबाजीला ‘मटका’ हे नाव पडले होते. आज मात्र अत्याधुनिक साधनांच्या मदतीने तो खेळला जातो आहे. इंटरनेटवर अशा संकेतस्थळांचा सुकाळ झाला आहे आणि आता तर मोबाईलवरील व्हॉटस्‌ऍपपर्यंत तो पोहोचलेला आहे. कांदोळीतील छाप्यात सापडलेली डिजिटल उपकरणे याची साक्ष देत आहेत. मुंबईतील अंडरवर्ल्ड निपटून काढण्यासाठी तेथील पोलिसांनी काही वर्षांपूर्वी एनकाऊंटर सत्र सुरू केले तेव्हा तेथील मटका किंगनीही आपला बाडबिस्तरा आवरला आणि ते गुजरात, राजस्थानकडे सरकले. आजही गुजरातमधूनच त्याची सूत्रे हलविली जातात आणि कांदोळीत पकडलेले गेलेले सूत्रधारही गुजरातीच आहेत. या व्यवसायात पैशाची उलाढाल हवालाच्या माध्यमातून होत असते हेही लक्षात घेण्याजोगे आहे. कांदोळीत पकडले गेलेली टोळी प्रकाश सावळा या मटका डेनची असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकाश ऊर्फ पप्पू सावळा याला एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून मुंबईत ‘मकोका’ लावण्यात आला आहे. तरीही हा व्यवसाय सुरळीत सुरू आहे हे आश्चर्यकारक आहे. मुंबई, कल्याण, मीलन असे पंचवीसहून अधिक मटका व्यवसाय चालवले जातात आणि प्रत्येकाचा मासिक नफा कोट्यवधींच्या घरात असतो. हे मटका किंग बड्या गुन्हेगारांच्या टोळ्यांना नियमित पैसा पुरवीत असतात एवढी त्यांची आर्थिक ताकद असते. तरी अलीकडच्या काळात मटक्याहून अधिक पैसे मिळवून देणारी क्रिकेटसारख्या खेळावरील सट्टेबाजी सुरू झाल्याने या धंद्याची रया चालली आहे. तरीही या व्यवसायाने समाजातील सर्वसामान्य वर्गामध्ये बस्तान बसवलेले आहे आणि काही संभावित मंडळीही कधी कधी मटका लावताना सापडते! मटका हा सर्वसामान्य मंडळींना अनपेक्षितरीत्या घबाड मिळवून देणारा व्यवसाय असल्याने तो कायदेशीर करावा अशी मागणी एकदा आमदार विष्णू वाघ यांनी केली होती. परंतु वाघ काही म्हणोत, हा व्यवसाय समाजविघातक आहे, ते एक व्यसन आहे आणि नैतिक मूल्यांची थोडी जरी चाड असेल तर तो बंद पाडला गेला पाहिजे. अर्थात, एकीकडे धनिकांच्या कॅसिनोंना मुक्तद्वार आणि मटक्याला मनाई असे करून मात्र नक्कीच चालणार नाही!