एक मजबूत असे लोकपाल विधेयक यावे, अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची इच्छा असल्याचे पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी काल येथे सांगितले. पक्षाने येथे आयोजित केलेल्या १५व्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
येथील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात या अधिवेशनाचे सुधाकर रेड्डी यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. गोव्यातील खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, अकुशल कामगारांना १० हजार रु. एवढे वेतन द्यावे, राज्यात कंत्राटी पद्धत रद्द करावी, मुलींना मोफत शिक्षण द्यावे, असे विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्ना उटगी, सुहास नाईक आदी नेते हजर होते. अधिवेशनाला सुमारे २ हजार कामगार उपस्थित होते.