मगो, राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्डशी युतीबाबत चर्चा सुरू

0
22

>> कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांची माहिती; भाजपचा पराभव हेच लक्ष्य

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हे कॉंग्रेसचे मुख्य ध्येय असून, त्यासाठी आम्ही मगो, राष्ट्रवादी कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती करण्याबाबत चर्चा करीत आहोत, अशी माहिती कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आलेक्स सिक्वेरा, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक आणि एम. के. शेख उपस्थित होते.
भाजपचे अनेक नेते आणि आमदार हे कॉंग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही दिनेश राव यांनी यावेळी केला. मात्र कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढील निवडणुकीत भाजपचा कसा पराभव करायचा, त्याची रणनीती पक्षाकडून तयार केली जात आहे. भाजपच्या पराभवासाठी जे जे काही करायची आवश्यकता आहे, ते ते केले जाणार आहे. भाजपचा पराभव करणे हे कॉंग्रेसचे मुख्य लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर करण्याबाबत पक्षाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले.

गुरुवारपासून ‘महागाईचा जागोर’ आंदोलन
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे आकाशाला भिडलेले दर याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष ‘महागाईचा जागोर’ हे आंदोलन सुरू करणार आहे. गुरुवार दि. १८ नोव्हेंबरपासून चाळीसही मतदारसंघात हे आंदोलन सुरू होईल आणि ते दि. २२ नोव्हेंबरला संपेल, असे दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर
उमेदवारांची घोषणा : तानावडे

गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच भाजप आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल स्पष्ट केले. तसेच युतीसाठी समविचारी पक्षांबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

युतीसाठी समविचारी पक्षांबरोबर चर्चा सुरू असून, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे स्थानिक पक्षांसोबत युतीसाठी चर्चा करीत असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

भाजपमध्ये अंतर्गत भांडणे व कलह नसून, कळंगुट मतदारसंघातील भाजपचे आमदार मायकल लोबो हे पक्षासोबतच आहे. त्यांनी वेगळी चूल थाटायचा प्रयत्न चालवला असल्याचे वृत्त खोटे, निराधार आणि दिशाभूल करणारे आहे. मायकल लोबो यांच्यावर आपला पूर्ण विश्‍वास आहे, असे ते म्हणाले.