मगोपच्या निर्णयाबद्दल भाभासुमंकडून अभिनंदन

0
84

प्रादेशिक भाषेतूनच शिक्षणाला व भारतीय भाषा सुरक्षा मंचला पूर्ण पाठिंबा देण्याच्या मगो पक्ष नेते तथा मंत्री सुदीन ढवळीकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मगो पक्ष व त्यांच्या नेत्यांचे भाभासुमंने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे. मंचचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या संदर्भातील पत्रक प्रसृत केले आहे.
भाजपा सरकारकडून जाणीवपूर्वक, अल्पसंख्यांक तुष्टीकरणासाठीच चिघळवण्यात आलेला भाषा विषय खरे म्हणजे पूर्णत: शास्त्रीय आधार व भावनिक सांस्कृतिक अधिष्ठानाशी जोडला गेलेला विषय आहे. हे मर्म नेमके ओळखून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनास संपूर्ण पठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य वेळी योग्य दिशेने घेतलेला भाषा व संस्कृती रक्षणास पोषक व गोमंतकीय भारतीय अस्मितेला तारक असा निर्णय आहे, असे वेलिंगकर यांनी पत्रकात म्हटले आहे. भाभासुमंच्या केंद्रीय समितीच्यावतीने याबद्दल मगो पक्षाचे व त्याच्या नेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असल्याचे त्यात नमूद केले आहे.
वाघांचेही कौतुक
त्याचप्रमाणे, मातृभाषा-रक्षणासाठी सत्ताधारी पक्षातील समान मत असणार्‍या आमदारांना एकत्र आणण्याची जबाबदारी, मोठ्या धाडसाने, निग्रहाने व सच्च्या मातृभाषा रक्षणाच्या बांधिलकीने, घेण्यासाठी पुढाकार घेतलेले उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांनी घेतल्याबद्दल त्यांचेही कौतुक व अभिनंदन भाभासुमं करीत आहे.

मातृभाषा रक्षण कार्याची
ही योग्य दिशा
भाभासुमंच्या कार्यक्रमात व सभामध्ये सहभागी होण्याची पूर्ण मुभा व स्वातंत्र्य तमाम म.गो. पक्षच्या कार्यकर्त्यांना देण्याचे घोषित करून भाभासुमंवर बहिष्कार घालण्याचे दुर्दैवी आवाहन करणार्‍या विशिष्ठ राजकीय पक्षाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम म. गो. पक्षाने केले आहे, ही मातृभाषा रक्षण कार्याची अत्यंत योग्य दिशा आहे, असे भाभासुमंचे मत आहे.