पणजीचा बाह्य विकास आराखडा नागरिकांसाठी खुला

0
86

>>सूचना, हरकतींसाठी महिन्याची मुदत

पणजी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आमदार मायकल लोबो यांनी काल पणजीचा बाह्य विकास आराखडा सूचना व हरकतीसाठीं खुला केला. येत्या ३० दिवसांच्या आत नागरिकांनी, सोसायट्यांनी किंवा अन्य संबंधितांनी आवश्यक त्या सूचना प्राधिकरणाकडे सादर कराव्यात, असे आवाहन लोबो यांनी काल पत्रकार परिषदेत केले. यावेळी पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर हेही उपस्थित होते.
गेल्या ५० वर्षांच्या काळात शहराचा झपाट्याने विकास झाला. लोकसंख्येतही वाढ झाली. वाहन पार्किंग समस्या निर्माण झाली. त्याचप्रमाणे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची दुरुस्ती किंवा फेरबांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित सोसायट्यांनी बिल्डरांच्या मदतीने या इमारतींचे फेरबांधकाम करण्याची तयारी दाखविल्यास एफएआर वाढवून देण्याची तयारी असल्याचे लोबो यांनी सांगितले.
‘जुंता’च्या जागेवर
पार्किंग निर्मितीची सूचना
प्रत्येक इमारतीसाठी पार्किंग सुविधा आवश्यक आहे. त्यासाठी तळमजला व पहिला मजला वाहन पार्किंगसाठी वापरणे आवश्यक आहे. जुन्ता हाऊस परिसरात वाहनांची व लोकांची गर्दी असते. त्यामुळे सदर इमारत पाडून तेथे पार्किंग सुविधा निर्माण करणे महत्वाचे आहे. पणजीच्या आमदारांनी यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन लोबो यांनी केले.
आल्तिनो परिसरात सरकारी इमारती आहेत. त्यांचेही फेरबांधकाम करण्याची गरज आमदार कुंकळेकर यांनी व्यक्त केली. आराखड्यात काही ठिकाणी रस्ते दाखविलेले आहेत. तेथे इमारती उभ्या आहेत, असेही ते म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पणजीचा विकास करण्याची गरज कुंकळेकर यांनी व्यक्त केली.