मगोच्या १० उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात ः ढवळीकर

0
31

मगो पक्ष पुढील आठवड्यापर्यंत गोवा विधानसभा निवडणुकीसाठीच्या १० उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करणार असल्याचे काल पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष १८ ते २० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले. त्यापैकी सुमारे १० ते १२ उमेदवार यापूर्वीच निश्‍चित झालेले आहेत. आम्ही पहिल्या टप्प्यात आमच्या १० उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करणार आहोत. उर्वरीत उमेदवारांच्या नावांची यादी नंतर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे ढवळीकर म्हणाले. या घडीला आमची कुठल्याही पक्षाबरोबर युतीसाठी बोलणी चालू नसल्याचे सांगून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे पुढे बोलताना त्यांनी नमूद केले.

येत्या निवडणुकीत मगो पक्षाला किती जागा मिळतील, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता आम्ही नुकताच कुठे आमचा प्रसार सुरू केलेला आहे. निवडणुकांची तारीखही अद्याप जाहीर झालेली नाही. बर्‍याच घडामोडी असल्याने आम्हाला किती जागा मिळतील हे आताच सांगणे शक्य नसल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.