भाजपकडून भंडारी समाजाचा राजकीय वापर : ‘आप’

0
25

भाजप भंडारी समाजाचा वापर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी करू पाहत आहे. त्यासाठी भाजप भंडारी समाजात फूट पाडू पाहत आहे, असा आरोप काल आम आदमी पक्षाने केला.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या दोन दिवसीय दौर्‍यात गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर भाजपने भंडारी समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आपचे नेते अमित पालेकर, राजदीप नाईक व नोनू नाईक यांनी निषेध केला. त्यासंबंधी बोलताना वरील नेते म्हणाले की भाजपने आतापर्यंत भंडारी समाजाचा वापर हा आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला आहे. केजरीवाल हे भंडारी समाजाच्या लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी गेले होते. ती राजकीय भेट नव्हती.

भाजप फूट पाडा आणि राज्य करा असे राजकारण करीत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आम आदमी पक्षाला राज्यात मिळणारा पाठिंबा पाहून भाजपच्या पायाखालील जमीन सरकू लागली असल्याचे वरील नेत्यांनी म्हटले असून भाजपने जातीचे राजकारण थांबवावे, अशी सूचनाही केली आहे. ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आणि बेतकी-खांडोळाचे माजी पंच सदस्य नोनू नाईक यांनी काल आम आदमी पक्षात प्रवेश केला.