>> विजय सरदेसाईंच्या वक्तव्यावर चर्चेची शक्यता
म. गो. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या आज सोमवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार्या केंद्रीय समितीच्या बैठकीत नगरनियोजन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारकडून मगो पक्षाच्या कार्यकारी समितीच्या पदाधिकार्यांना मिळणार्या सापत्नभाव वागणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री सरदेसाई यांनी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनलेला आहे. याच विषयामुळे केंद्रीय समितीची खास बैठक बोलाविण्यात आली आहे.
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या मागे झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा झाली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मगो पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या विषयावर चर्चा होणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी दोन वर्षाची मुदत वाढवून घेण्यात आलेली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मगो पक्षाचा समावेश आहे. परंतु मगो पक्षाच्या पदाधिकार्यांना एकाही महामंडळावर स्थान देण्यात न आल्याने असंतोषाचे वातावरण पसरले आहे. पदाधिकार्यांमध्ये पसरलेल्या असंतोषावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार तथा पक्षाचे सरचिटणीस लवू मामलेदार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासोबत मगो पदाधिकार्यांना मिळणार्या सापत्नभाव वागणुकीच्या या विषयावर यापूर्वी चर्चा केलेली आहे. मगो पक्षाच्या पदाधिकार्यांना मिळणारी सापत्न वागणूक मंत्री ढवळीकर यांच्या नजरेस आणून देण्यात आली आहे, असे सरचिटणीस मामलेदार यांनी सांगितले.