गुजरातचा डंका

0
110

गुजरात विधानसभा निवडणुकीचा डंका त्या घोषित होण्यापूर्वीच वाजू लागला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाची धुरा ज्यांच्याकडे लवकरच सोपविली जाणार आहे, त्या राहुल गांधींसाठीही या निवडणुकीत पक्षाने चमकदार कामगिरी करून दाखवणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस या दोहोंनी या निवडणुकीवर सर्व लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. भाजपाशी तुल्यबळ लढा देण्यासाठी कॉंग्रेसने प्रथमच सर्व विरोधकांची महाआघाडी बांधण्याच्या प्रयत्नांना कधी नव्हे तो वेग दिलेला दिसतो. दुसरीकडे सत्ताधारी भाजपला आपल्या दोन दशकांच्या सत्तेला अबाधित राखायचे आहे. स्वतः पंतप्रधान मोदी या महिन्यात पाच वेळा गुजरातमध्ये गेले. सर्वप्रथम आपल्या जन्मभूमी वडनगरमध्ये दौरा काढून त्यांनी आपली गुजरातशी नाळ घट्ट जुळलेली आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांचेही गुजरातमध्येच स्वागत केले गेले. त्यांच्या उपस्थितीत अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनची कोनशिला बसवली गेली, वर्षानुवर्षे रखडलेले सरदार सरोवर धरण राष्ट्राला समर्पित केले गेले. काल रविवारीही मोदी गुजरात दौर्‍यावर होते. ११४० कोटींचे प्रकल्प तेथे राबवले जात आहेत. शिक्षकांपासून नगरपालिका कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांना वेतनवाढ दिली गेली आहे. ही सगळी भाजपाच्या गेल्या दोन दशकांच्या सत्तेतून तेथे निर्माण होऊ शकलेली ‘अँटी इन्कम्बन्सी’ पुसून काढण्यासाठीची धडपड आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसने यावेळी भाजपाविरोधात सर्व विरोधी घटकांची महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न जोमाने सुरू केले आहेत. पटिदारांचे नेते हार्दिक पटेल, दलितांचे नेते जिग्नेश मेवानी आणि ओबीसींचे नेते अल्पेश ठाकूर यांना कॉंग्रेसने साद घातली आहे. अल्पेश ठाकूर तर स्वतःच कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आहेत. छोटू वसावांसारख्या शरद यादव समर्थक जेडीयू आदिवासी नेत्यालाही जवळ केले जात आहे. गुजरातच्या १८२ जागांपैकी १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट कॉंग्रेसने समोर ठेवले आहे. भाजपाने या निवडणुकीला ‘वंशवाद विरुद्ध विकासवाद’ असे स्वरूप दिले आहे. भाजपा सरकारने केलेला विकास आणि गांधी घराण्याची राहुल गांधींपर्यंत येऊन ठेपलेली घराणेशाही यातून निवड करा असे भाजपचे मतदारांना सांगणे आहे. गुजरात दंगलीसारख्या प्रसंगीच्या विरोधकांच्या टीकेची गुजराती जनतेच्या आत्मसन्मानाशी सांगड घालून कॉंग्रेस गुजरातविरोधी आहे अशी भूमिका भाजपा मांडत आहे. सरदार पटेल, त्यांची कन्या मणीबेन, मोरारजी देसाई आदींना कॉंग्रेसने कशी वागणूक दिली, सरदार सरोवराला केवळ त्याला पटेलांचे नाव दिलेले असल्याने कसा विलंब केला वगैरे मुद्दे वर काढून कॉंग्रेस ही गुजरातविरोधी असल्याचे जनतेच्या मनावर ठसवले जात आहे. नुकत्याच केदारनाथच्या भेटीत आपण देऊ केलेली मदत कॉंग्रेस सरकारने नाकारली होती असे मोदी म्हणाले त्यालाही विशेष अर्थ आहे. मोदींची लोकप्रियता अबाधित आहे आणि पक्षाचे राज्यात बळकट संघटन आहे, त्यामुळे ही निवडणूक जिंकणे कठीण जाणार नाही असा भाजपाचा विश्वास आहे. पण नोटबंदी, जीएसटीनंतरची ही निवडणूक असल्याने गुजरातसारख्या व्यापार्‍यांच्या राज्यामध्ये भाजपला ही निवडणूक कठीण जाऊ शकते असा कॉंग्रेसचा होरा आहे. त्यामुळे हा दबाव वाढवण्यासाठी त्यांनी ओबीसी, दलित, पटिदार नेत्यांना कवेत घेण्याचा आटापिटा चालवला आहे. आरक्षणाचा विषय त्यामुळे ऐरणीवर आणला गेला आहे. जीएसटीमुळे व्यापारीवर्ग नाराज आहे आणि ही मते भाजपाच्या विरोधात जाऊ शकतात असे कॉंग्रेसला वाटते. विरोधकांची महाआघाडी बांधण्यात कॉंग्रेसला यश येणार का यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. कॉंग्रेसने दिलेला उमेदवारीचा प्रस्ताव पटिदारांचे प्रभावी नेते हार्दिक पटेल यांनी त्वरित फेटाळून लावला असला तरी आपल्याला अटकेत टाकणार्‍या भाजपाला घेरण्यासाठी ते आपली ताकद कॉंग्रेस पक्षाच्या मागे उभी करू शकतात. दलितांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि दारूबंदीच्या शिथिल अमलबजावणीविरुद्ध लढत आलेले नेते जिग्नेश मेवानी, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर या सर्वांवर कॉंग्रेसची भिस्त आहे. राज्यसभेच्या गेल्या निवडणुकीतील अहमद पटेल यांच्या विजयाने कॉंग्रेसचे मनोबल गुजरातेत उंचावलेले आहे. नुकत्याच झालेल्या पंजाबमधील गुरुदासपूरच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार विजयी झाल्यानेही त्यांच्या मनात पक्षाच्या पुनरुज्जीवनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे मोदींच्या गुजरातमध्ये अवघी शक्ती कॉंग्रेसने पणाला लावलेली दिसते. परंतु या महत्त्वाकांक्षेचा फुगा या निवडणुकीत हवेत उडणार की फुटून पायदळी पडणार हे पाहणे खरोखरच औत्सुक्याचे ठरणार आहे.