Home Featured मंदीच्या दिशेने

मंदीच्या दिशेने

0

युद्धस्य कथा रम्यः असे म्हणतात, परंतु हे केवळ सुभाषितापुरते ठीक आहे. प्रत्यक्षात युद्ध हे सर्वांसाठी संकटांची मालिका घेऊनच येत असते. सध्याच्या अमेरिका – इराण युद्धामध्येही हेच घडते आहे. इराणची एकंदर रणनीती पाहिली, तर सर्वशक्तीनिशी अमेरिकेचा प्रतिकार करण्याचा त्याचा ठाम निर्धार दिसतो. अर्थात, महासत्ता अमेरिकेपुढे टिकण्याएवढी इराणची क्षमता नाही, परंतु हे युद्ध पश्चिम आशियात लढले जाते आहे ह्याचे भान अमेरिकेलाही ठेवावे लागत आहे आणि इस्रायलच्या माध्यमातून ती हे युद्ध लढते आहे. आखातीतल आपल्या मित्रदेशांतील तळांची मदत जरी अमेरिकेने घेतली असली, तरी त्या देशांना थेट युद्धात उतरवण्यात स्वारस्य नाही हेही ती जाणून आहे. दुसरीकडे, इराण हे युद्ध जास्तीत जास्त कसे विस्तारेल आणि अधिकाधिक कसे लांबेल ह्याची रणनीती राबवताना दिसते आहे. खामेनेई यांचा खात्मा करणाऱ्या इस्रायलला थेट लक्ष्य करण्यापेक्षाही अमेरिकेचे पश्चिम आशियातील तळ, दूतावास, आखाती महत्त्वाची ठिकाणे आदींना लक्ष्य करून इराणने स्पष्ट संदेश दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला ह्या युद्धाचे मोठे हादरे बसावेत असा त्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. त्यासाठी त्यांच्यापाशी हुकुमी एक्का आहे तो होर्मुझच्या सामुद्रधुनीचा. तेथून होणारी जागतिक तेलवाहतूक बंद पाडण्यात इराणला यश आलेले आहे. शिवाय आराम्कोसारख्या तेल कंपनीच्या तेलविहिरींवर इराणने दोन वेळा हल्ले चढवले. ह्या सगळ्यामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक किंमती भडकत चालल्या आहेत. अगदी भारतीय तेल कंपन्यांना देखील कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यांच्यातील वाढती तफावत सहन करणे दिवसागणिक जड जाऊ लागले आहे. पेट्रोलियम हा ज्यांचा कच्चा माल असतो, अशा वस्तू – मग त्यात डिटर्जंट साबणापासून सिंथेटिक फायबर धागेदेखील आले, अशा सर्वांवर ह्या युद्धाचा परिणाम दिसणार आहे, कारण कच्च्या तेलाचे दर भडकणे ह्याचाच अर्थ उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे, वाहतुकीचेही दर भडकणे असाच असतो. त्यामुळे एकीकडे आयात – निर्यात क्षेत्राला जसे ह्या युद्धाचे चटके बसू लागले आहेत, तसेच ते देशोदेशीच्या उत्पादनक्षेत्रालाही बसत आहेत. जागतिक विमान वाहतूक तर संकटात सापडली आहेच. प्रवासी वाहतूक आणि पर्यटन ह्या दोन्ही क्षेत्रांना जबर तडाखा बसला आहे. हे युद्ध आपल्या मर्यादित ताकदीनिशी अधिकाधिक कसे ताणता येईल आणि त्यायोगे युद्ध आटोपते घेण्याचा अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव कसा आणता येईल ह्याचे आडाखे इराण बांधताना दिसत आहे. ज्या चिकाटीने इराणने ह्या युद्धामध्ये प्रत्युत्तर दिले त्यातून हा निर्धार स्पष्ट दिसतो. इराणकडून एखादे द्रोन जेव्हा स्फोटकांसहीत शत्रूच्या ठिकाणाला लक्ष्य करून पाठवले जाते, तेव्हा त्या द्रोनची किंमत काही डॉलरचीच असते, परंतु त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मारा कराव्या लागणाऱ्या क्षेपणास्त्रांची किंमत काही लाख डॉलरच्या घरात असते. त्यामुळे अमेरिकेलाही हे युद्ध परवडणारे राहणार नाही. युद्धाचे परिणाम अवघ्या जगाला जाणवू लागले आहेत. शेअर बाजार ढासळत आहेत, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दरही घसरत राहिला आहे. काल तो 92 रुपये 15 पैशांवर जाऊन पोहोचला होता. रुपयाचे असे अवमूल्यन होणे हे चालू खात्यातील तुटीत मोठी भर घालणारे असते. त्यामुळे हा दबाव अर्थव्यवस्थेवर पुढील काळात राहील. शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात गेले. इराणवर निर्णायक प्रहार करून हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न इस्रायलच्या माध्यमातून आता अमेरिका करील, परंतु त्यातून होणारी प्राणहानी प्रचंड असेल. इराणमध्ये सत्तांतर व्हावे ह्या उद्देशाने अमेरिकेने हे युद्ध पुकारले, परंतु त्या सत्तांतराची नामोनिशाणी अजून तरी नाही. उलट खामेनेई यांच्याच मुलाने आता सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांना ठार मारले गेल्याने शांततापूर्ण तोडग्याचा मार्गही बंद झाला आहे. इराणमधील शाळेवरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुलांच्या खोदलेल्या कबरींचे छायाचित्र काळीज पिळवटून टाकणारे आहे. शेवटी कोणत्याही युद्धात निरपराध माणसे हकनाक बळी जात असतात. त्या प्राणांचे मोल कोणीच लक्षात घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प एकीकडे स्वतःला शांतिदूत म्हणवतात, नोबेल शांती पुरस्काराची अपेक्षा बाळगतात आणि दुसरीकडे अशा प्रकारचा नरसंहार चालवतात हे पटणारे नाही. इराणही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. आपण अजून सर्वांत घातक शस्त्रास्त्रे वापरलेली नाहीत असे तो सांगतो आहे. म्हणजेच हे युद्ध अधिकाधिक भीषण होण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय ह्या सगळ्याचा मूक प्रेक्षक होऊन राहणार का?