Home बातम्या मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा

0

अभियंत्यावरील चिखलफेक प्रकरण; न्यायालयाने 1 लाख रुपयाचा दंडही ठोठावला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यावर चिखलफेक केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयाने काल मोठा धक्का दिला. अभियंत्यावर चिखल फेकल्याच्या आरोपातून नितेश राणे यांना निर्दोष ठरवले असले, तरी 504 कलमाखाली सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी त्यांना 1 महिना कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मत्स्य व बंदर विकास मंत्री असलेल्या नितेश राणे यांना ही शिक्षा सुनावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे प्रकरण 4 जुलै 2019 रोजी घडले होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी कार्यकारी अभियंता प्रकाश शेंडेकर यांना कणकवली येथील गडनदी पुलावर बोलावले होते. यावेळी महामार्गाच्या दुरावस्थेवरून संतापलेल्या राणे यांच्या उपस्थितीत अभियंत्यावर चिखल ओतण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, त्यांना पुलाला बांधून ठेवून चिखलातून चालत नेण्यात आले होते. या प्रकरणी प्रकाश शेंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नितेश राणे यांच्यासह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काल या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने आपला निकाल देताना पुढील निरीक्षणे नोंदवली. नितेश राणे यांना शांततेचा भंग करणे आणि त्यासाठी इतरांना प्रवृत्त करणे या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. चिखलफेक करण्याच्या थेट आरोपातून त्यांना निर्दोष ठरवले असले तरी प्रक्षोभक वर्तनासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य 29 संशयितांना पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले.

निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देणार
जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नितेश राणे यांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत मागितली. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली असून, त्यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिला आहे.