राज्यात काल मंगळवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ७९६ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ४७ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५५,०७३ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ५८२ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५० टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ४८ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५३,६९५ एवढी झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल खात्यातर्फे १५५४ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
कोरोना संसर्ग झालेल्या १५,९६६ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २९,४८४ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ४,९६,०८९ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक ८५ रुग्ण असून वास्कोत २९, कुठ्ठाळीत २५ तर फोंड्यात २४ जण उपचार घेत आहेत. उत्तर गोव्यात पणझीत ५४, चिंबलमध्ये ४६, कांदोळी ३९, म्हापसा ४२, तर पर्वरीत २८ जण उपचार घेत आहेत.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ४० जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर १८ जण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.
मुख्यमंत्री घेणार
आज कोरोना लस
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज बुधवार दि. ३ मार्च रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेणार आहेत. साखळी येथील आरोग्य केंद्रात सकाळी १० वा. ते लस घेणार आहेत.