हडफडे अग्निकांडानंतर त्या नाईटक्लबच्या मालकांचे वागातोर येथील दुसरे बेकायदेशीर बांधकाम काल बुलडोझरने पाडण्यात आले. पण एवढी मोठी दुर्घटना घडून गेल्यानंतर आता हे वरातीमागून घोडे नाचवून उपयोग काय? मुळात हे बांधकामही बेकायदेशीर होते ह्यालाच खरे तर ह्या कारवाईतून दुजोरा मिळाला आहे. हडफडे अग्निकांडानंतर एकीकडे मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जखमींना इस्पितळात हलविण्याचे काम सुरू असताना तिकडे दिल्लीत राहणारे नाईटक्लबचे मालक दुर्घटनेची बातमी कळल्याबरोबर पहाटेच्या पहिल्या विमानाने थायलंडमधील फुकेतला पळाले. इंडिगोचे हे दिल्लीहून फुकेतला जाणारे थेट विमान पहाटे 5.25 वाजता निघते. आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी विमानतळावर किमान दोन तास आधी पोहोचणे आवश्यक असते. नाईटक्लबच्या मालकाचे घर दिल्लीच्या ज्या भागात आहे, तेथून विमानतळ गाठायला किमान दीड तास लागतो. हे गणित लक्षात घेतले तर मध्यरात्री हडफड्यातील दुर्घटना घडल्यानंतर त्याविषयी कळताच तासाभरात सामानाची बांधाबांध करून ते भारताबाहेर पळ काढण्याच्या इराद्याने विमानतळाच्या दिशेने निघाले असाच ह्याचा अर्थ होतो. भारतात राहिलो तर आपल्याला आता अटक टाळता येणार नाही, कोणीही राजकीय पाठीराखा आपल्याला आता वाचवू शकणार नाही हे कळून चुकताच हे महाभाग भारताबाहेर पळून गेले. फुकेत विमानतळावर उतरतानाची त्यांची छबी इमिग्रेशनवर टिपली गेली आहे. आता इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढल्यानंतर त्यांचा माग काढण्यास सुरूवात होईल. खरे तर पोलिसांनी त्यांची सर्व बँक खाती तातडीने गोठविणे आवश्यक होते, जे अद्याप घडलेले नाही. भारत आणि थायलंडदरम्यान हस्तांतरण करार आहे आणि त्यामुळे लवकरच ह्या पळपुट्या बंधूंचा खेळ खलास होईल अशी आशा आहे. परंतु ह्या प्रकरणात केवळ ह्या नाईटक्लबचे मालक पकडले जाणे पुरेसे ठरेल काय? ज्या भ्रष्ट व्यवस्थेने गोव्याच्या गावोगावी अशा अवैध गोष्टींचा सुळसुळाट केलेला आहे, तिचे काय? हडफडे दुर्घटनेनंतर गोव्याच्या पर्यटनक्षेत्राचा काळाकुट्ट चेहरा प्रकर्षाने जगासमोर आला. संपूर्ण देशात आज गोव्याची छीः थू होते आहे. भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट पोलीस अधिकारी अशी भ्रष्टाचाराची हप्तेबाज साखळीच ह्या सगळ्या गैरगोष्टींना थारा देत राहिली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आजवर ज्या गोष्टींची केवळ खासगीत चर्चा चाले, त्या गोष्टी आता ढळढळीतपणे आणि सबळ पुराव्यांनिशी चव्हाट्यावर आल्या आहेत. केवळ कागदी घोडे नाचवून कारवाईचे देखावे करून खुलेआम ज्या प्रकारे गैरगोष्टींकडे कानाडोळा चालत आल्याचे हडफडे दुर्घटनेतून दिसले ते बोलके आहे. फारच ओरड होऊ लागताच कागदोपत्री कारवाईचा देखावा तर करायचा, परंतु प्रत्यक्षात संबंधितांना त्यातून पळवाटा दाखवायच्या, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायचे ह्यामागील अर्थकारण न कळण्याएवढी गोमंतकीय जनता दुधखुळी नाही. प्रस्तुत प्रकरणात वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई रोखली होती असे आता स्थानिक पोलीस अधिकारी सांगत आहेत. तसे असेल तर त्या आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे नोंदवण्याची हिंमत गृहखात्याने दाखवायला हवी. ज्यांना अटक झाली आहे, ज्यांचे निलंबन झाले आहे, त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवले जावेत. पंचवीस बळी जाणे ही काही साधी गोष्ट नव्हे. पहलगाममध्ये सव्वीस पर्यटकांचा बळी गेला, त्याचा सूड पाकिस्तानात घुसून उगवला गेला होता. हे जे इथल्या भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी आहेत, त्यांच्या हत्येचा सूड कोण उगवणार? इथे सत्ताधारी पक्षाचेच अनेक आमदार आणि नेते गैरकृत्यांत गुंतलेले आहेत. त्यांचेच स्वतःचे अवैध व्यवसाय आहेत. न्यायदंडाधिकाऱ्यांकरवी सरकारने चौकशी घोषित केली आहे. शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीचे पुढे काय झाले हे आपण पाहिलेच आहे. ह्या प्रकरणात केवळ मालक आणि व्यवस्थापकांवर तोंडदेखली कारवाई पुरेशी नाही. अशा गैरधंद्यांना येथे रुजवणारी जी भ्रष्ट व्यवस्था आहे, तिचे पंचायतीपासून मंत्रालयापर्यंतचे जे जे कोणी पाठीराखे घटक आहेत, ती साखळी उद्ध्वस्त करण्याची खरी गरज आहे. कोणीही दिल्लीवाल्याने यावे, येथील राजकारण्यांना हाताशी धरावे आणि वाट्टेल ते धंदे थाटावेत हा खेळ आता पुरे झाला. गोव्याची जनता ह्या अग्निकांडाने संतप्त आहे. तिला दिलासा हवा आहे. घाम गाळून घरसंसार चालवणाऱ्या वयाच्या विशी पंचविशीतील मुलांचा हकनाक बळी ह्या अग्निकांडात गेलेला आहे. रोजीरोटी कमावण्यासाठी हजारो कि. मी. दूर गोव्यात स्वप्ने घेऊन ही मुले आली होती. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेने त्या स्वप्नांसह त्यांचा कोळसा केला. ह्याची थोडी तरी शरम आपण बाळगणार की नाही!