भेडशीत मधमाशांच्या हल्ल्यात १६ जखमी

0
101

शनिवारी सकाळी १० वा. च्या सुमारास भेडशी खालचाबाजार येथील कॉजवे नजीक असलेल्या भल्या मोठ्या घोटींग झाडावर मधमाश्यांनी बांधलेल्या पोळ्यावर त्याच झाडाची फांदी मोडून पडल्याने पोळ्यावरील चवताळलेल्या मधमाश्यांनी याठिकाणाहून आठवडा बाजारासाठी येणार्‍या तसेच रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांवर अचानक हल्ला चढवल्याने त्यात एकूण १६ जण जखमी झाले. त्यांना तातडीने साटेली-भेडशी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. बचाव करण्यासाठी पिकुळे येथील महालकर पती-पत्नीने नदी पात्रातील पाण्यात उड्या घेवून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण पाण्यावर राहूनही या मधमाश्यांनी या दांपत्यावर हल्ला चढवला. यातील प्रर्मिला राजाराम गवस या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्यांना तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने साटेली-भेडशी आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर आरोग्य केंद्राचे डॉक्टर कर्मचारी यांनी तात्काळ उपचार सुरू केले.