भीषण भूकंपाने तैवान हादरले

0
5

>> देशातील 25 इमारती कोसळल्या

>> जपान, चीन, फिलिपाईन्समध्येही धक्के

तैवानमध्ये काल बुधवारी सकाळी झालेल्या भीषण भूकंपामुळे तैवानमधील 25 ते 26 इमारती कोसळल्या. 7.5 रिश्टर स्केलवरील हा भूकंप असून गेल्या 25 वर्षांतील हा सर्वांत मोठा भूकंप असल्याचे म्हणण्यात आले आहे. त्याचे धक्के जपान आणि फिलिपाइन्सपर्यंत जाणवले. तैवानच्या अग्निशमन विभागाने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 50 जखमी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या भूकंपामुळे दक्षिण जपान आणि फिलिपाईन्सच्या बेटावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

राजधानी तैपेईच्या अनेक भागांमध्ये भयंकर भूकंप झाला. तैवानच्या पूर्व किनारपट्टीपासून अगदी 15.5 किमी खोलीवर सकाळी 7 वाजून 58 हा भूकंप झाला आहे. पूर्व तैवानमधील हुआलियन शहरात हा भूकंप झाला. त्याचे केंद्र पृथ्वीपासून 34 किलोमीटर खाली होते. भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. जपानच्या हवामान खात्याने समुद्रात 3 मीटर म्हणजेच सुमारे 10 फूट उंचीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवली होती. या भूकंपामुळे इमारतीखाली काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोच्या मते, तैवानमध्ये 25 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. याआधी 1999 मध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

तैवानमध्ये नुकसान
तैवानच्या मीडियानुसार, भूकंपानंतर तैवानमधील 91 हजारांहून अधिक घरे वीजेविना आहेत. भूकंपामुळे तारा आणि वीज प्रकल्पांचे नुकसान झाले आहे.
पूर्व तैवानमधील हुआलियन शहरात झालेल्या भूकंपामुळे इमारत वाकडी झाली.
25 वर्षांतील सर्वात मोठा भूकंप
तैवानच्या अधिकृत केंद्रीय वृत्तसंस्थेने सांगितले की, 1999 पासून बेटावर बसलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. त्यावेळी 7.6 रिश्टर स्केलच्या धक्क्‌‍याने सुमारे 2400 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 50 हजारांहून अधिक इमारती भूईसपाट झाल्या होत्या.

इतर देशांतही धक्के
फिलीपाईन्सच्या भूकंपविज्ञान यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्र किनारी भागातील रहिवाशांसाठी एक सतर्कतेचा इशारा दिला असून त्यांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, शांघायमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. चीनच्या फुझियान प्रांतातील फुझोऊ, झियामेन, क्वानझोउ आणि निंगडे येथेही हे धक्के जाणवले.