Home बातम्या भीषण अग्निकांड

भीषण अग्निकांड

0

तामीळनाडू एक्स्प्रेसमधील भीषण अग्निकांडात कित्येक निष्पाप प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की त्यामागे घातपात आहे, याची माहिती आता रेलमंत्री मुकूल रॉय यांनी घोषित केलेल्या चौकशीअंती बाहेर येईलच, परंतु केवळ दुर्घटनेच्या कारणाचा शोध लागणे पुरेसे ठरत नसते. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन काय करणार आहे हा खरा प्रश्न आहे. धावत्या रेलगाडीला आग लागून प्रवाशांच्या जिवावर बेतण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागांत अशा दुर्घटना बर्‍याच वेळा घडल्या आहेत. १९८५ साली मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारे धावत्या रेलगाडीला आग लागून पन्नास प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ९० साली पाटण्याजवळ अशाच दुर्घटनेत सत्तर प्रवाशांचा बळी गेला होता. गोध्रा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसमध्ये आग लागल्यानंतर काय घडले हा इतिहास आहेच.

रूळावरून डबे घसरणे, एकाच रेलमार्गावर एकापेक्षा अधिक रेलगाड्या एकाचवेळी येणे, उघड्या असलेल्या रेल्वे फाटकावर वाहनाला धडक बसणे, रेलमार्गावर दरड कोसळणे अशा नानाविध प्रकारे आजवर भीषण रेल दुर्घटना घडलेल्या आहेतच. पण अशा प्रकारच्या अग्निकांडांची देखील पुनरावृत्ती होणे ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. वास्तविक २००७ साली रेल्वेने एक उच्चस्तरीय समिती नेमून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या संबंधाने काय काय करता येईल त्याचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यामध्ये गुप्तचर विभाग, रेल्वे पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा दल अशा विविध दलांमधील तज्ज्ञ अधिकार्‍यांनी अभ्यास करून रेल्वे सुरक्षिततेसंदर्भात २१ शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी काहींची अंमलबजावणी केली गेली. परंतु तामीळनाडू एक्स्प्रेसमधील ताजी दुर्घटना ही सारे काही आलबेल नाही याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी आहे. रेल्वेतून ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करू नये असा दंडक आहे. परंतु तरीही अशा वस्तूंची वाहतूक सर्रास चालत असते. रेलगाड्यांमधील वायरिंगही अनेकदा जुनाट व असुरक्षित स्वरूपात असते. त्यातून शॉर्ट सर्किट होऊ शकते. रेलगाडीतील पँट्रीकारला आग लागून ती वाहत्या वार्‍यासोबत झपाझप अन्यत्र पसरू शकते. इतकेच कशाला, एखाद्या प्रवाशाजवळची जळती सिगारेट, सोबत घेतलेले फटाके, अन्य ज्वालाग्राही सामानातूनही आगीचा भडका उडू शकतो, इतरांच्या जिवावर बेतू शकतो. वास्तविक प्रत्येक रेलगाडीमध्ये आग लागली किंवा धूर येऊ लागला तरी त्याची कल्पना येऊ शकेल असे सेन्सर बसवणे गरजेचे आहे. अलीकडेच दिल्ली – भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ते लावलेही गेले आहेत. परंतु या देशाच्या कानाकोपर्‍यांत हजारो रेलगाड्या हरक्षणी धावत असतात. या सर्वांमध्ये प्रत्येक डब्यात ही उपकरणे लावणे हे मोठे खर्चिक काम आहे. रेलगाडीच्या डब्यांची सध्याची रचना तर अशी असते की एकदा आग लागली की तो डबा त्यातील बर्थवरील फोमच्या गाद्या, वातानुकूलित डब्यांत आतून असणारे प्लास्टिकचे आवरण, डब्यांमध्ये वापरलेले रासायनिक रंग या सर्वांमुळे भरभरा पेटत जातो. एका डब्यातून दुसर्‍या डब्यात वाहत्या वार्‍यासरशी आग भडकत जाते. आग लागल्याची कल्पना येऊन रेलगाडी थांबवली तरी आग विझवण्याची साधनसामुग्री जवळ नसते. प्रवासी बर्‍याचदा झोपलेले असतात. त्यांना कल्पना असली तरी धावत्या गाडीतून बाहेर उडी घेणे शक्य नसते. त्यामुळे मरणाला सामोरे जाण्यावाचून पर्याय राहत नाही. या संकटाचा सामना करण्यासाठी रेल्वेमध्ये विशेष सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. स्मोक डिकेक्टर, दोन डब्यांदरम्यान फायर बॅरियर, थर्मिक लॉक, शॉर्ट सर्किट होऊ नये यासाठी विशेष संरक्षक व्यवस्था अशी अनेक आश्वासने यापूर्वी संसदेत संबंधित रेलमंत्र्यांकडून दिली गेलेली आहेत, जी अद्याप प्रत्यक्षात यायची आहेत. निदान डब्यांमध्ये अग्निरोधक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करणे तरी अशक्य असू नये. अशा दुर्घटना जगभरात घडत असतात, पण एकदा दुर्घटना घडली की तिची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तेथे कसोशीने प्रयत्न होतात. आपल्याकडे मात्र येरे माझ्या मागल्याचाच प्रकार चालतो हे दुर्दैवी आहे.