‘भारत रत्न’ स्वीकारण्यास नेताजींचे कुटुंबिय अनुत्सुक

0
106

बेपत्ता प्रकरणाचा आधी सोक्षमोक्ष लावा
थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार यंदा भारत रत्न देण्यात येणार असल्याची चर्चा असली तरी त्यांच्या बहुतेक कुटुंबियांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नेताजींना भारत रत्न देण्याऐवजी त्यांच्या गुढरित्या बेपत्ता होण्याबाबत शोध लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘‘नेताजी १९४५ पासून बेपत्ता झाले होते. जेव्हा तुम्ही त्यांना मरणोप्रांत भारत रत्न पुरस्कार देऊ इच्छिता तेव्हा तुम्ही सांगायला हवे की त्यांचे निधन कधी झाले. परंतु याचा पुरावा कोठे आहे? त्यांचा गौरव करण्याची सर्वात चांगली गोष्ट ठरेल ती ही की ते गूढरित्या बेपत्ता होण्या मागील कारण उलगडू शकणार्‍या त्यासंबंधीच्या सरकारी फायलींचे निर्वर्गीकरण करणे’’. अशी प्रतिक्रिया नेताजींचे नातू पुतण्या चंद्रकुमार बोस यांनी व्यक्त केली आहे.
आपण या विषयावर नेताजींच्या कुटुंबातील ६० सदस्यांशी चर्चा केली असून त्यापैकी कोणीही त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे आपल्याला सांगितले आहे असे बोस म्हणाले. अलीकडेच नेताजींचे कुटुंबीय व ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नेताजी बेपत्ता प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. ब्रिटिशांनी नेताजींना स्थानबध्द केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी ते तेथून १९४१ साली निसटले होते. १९४५ साली ते नाहीसे झाल्यानंतर तो आजतागायत चर्चेचा विषय राहीला आहे. त्यांचे १८ ऑगस्ट १९४५ साली तैवान येथील विमान अपघातात निधन झाल्याचे मत मुखर्जी आयोगाने नाकारले होते.