प्रदेश कॉंग्रेसचा आज विधानसभेवर मोर्चा

0
80

सत्तेवरील राजकारण्यांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी व सरकारच्या अपयशांबाबत आरोपपत्र सादर करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने आज विधानसभेवर मोर्चा नेण्याची तयारी केली आहे. या मोर्चात पेडणे ते काणकोण भागातून सुमारे हजारभर कॉंग्रेसजन सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल दिली.
प्रदेश कॉंग्रेसने गेल्या २२ रोजी या मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र मुसळधार पावसाचे कारण पुढे करून मोर्चा पुढे ढकलण्यात आला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंह आणि सचिव चेल्लाकुमार गोव्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हा मोर्चा आझाद मैदानावरून नेण्याची तयारी केली होती. परंतु सरकारने १४४ कलम जारी करून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न चालविल्याने प्रदेश कॉंग्रेसने पर्वरीच्या बाजूने जमा होऊन तेथूनच विधानसभेवर मोर्चा नेण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, सरकारने आंदोलन चिरडून टाकण्याच्या हेतूने आज पर्वरी भागात कडक बंदोबस्त ठेवण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिला आहे. विधानसभेत सध्या कॉंग्रेसचे फक्त ९ आमदार असून त्यापैकी माविन गुदिन्हो हे पक्षापासून जवळजवळ अलिप्तच राहिले आहेत. विरोधी नेते प्रतापसिंह राणे व प्रदेश अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्यातील मतभेद पराकोटीला पोचले आहेत. त्यामुळे पक्षाच्या आजच्या मोर्चात किती लोकांचा प्रतिसाद मिळेल हे आजच स्पष्ट होऊ शकेल.