‘भारत रत्न’ साठी कॉंग्रेस नेत्यांकडून नावांची जंत्री

0
109

अटल बिहारी वाजपेयी व नेताजी सुभाष चंद्र बोस यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर होण्याची चर्चा चालू असताना कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी या पुरस्कारासाठी नावांची जंत्रीच दिली आहे. रशिद आल्वी यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशी राम व अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांना भारत रत्न देण्याची मागणी केली.
सुभाष चंद्र बोस यांनाही हा पुरस्कार द्यावा व अंदमान -निकोबार बेटांना नेताजींचे नांव द्यावे असेही आल्वी यांनी म्हटले आहे. मात्र पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र, हरयाणासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर करावी असे त्यांनी सुचविले आहे. या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनी भारत रत्नसाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाल लजपत राय, राज बिहारी बोस, जन. मोहन सिंग, ऍनी बेझंट, गोपालकृष्ण गोखले यांचीही नावे व्टिटरवर सुचविली आहेत.
याआधी भाजप नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना भारत रत्न देण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषणा करण्याची शक्यता आहे.