भारत बंदला हिंसक वळण : ८ ठार

0
140
Muzzaffarnagar: Smoke billows out of burning cars during 'Bharat Bandh' against the alleged 'dilution' of Scheduled Castes/Scheduled Tribes act, in Muzzaffarnagar on Monday. PTI Photo (PTI4_2_2018_000236B)

>> केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

ऍट्रोसिटी कायद्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला विरोध करत विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण लागल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्ये प्रदेशात ५, उत्तर प्रदेशमध्ये २ तर राजस्थानमध्ये १ अशा पाच जणांचा या आंदोलनात आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती वृत्त संस्थेने दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ऍट्रोसिटी कायद्यात बदल करू नये अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

काल सकाळपासून देशभरातील अनेक राज्यांत बंदचे हिंसक पडसाद उमटले. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंडमध्ये दलित तसेच आदिवासी संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. बिहारातील आरा, भागलपूर, फोरबिसगंज येथे रेलरोको आंदोलन करण्यात आले. येथे डाव्या पक्ष संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला.
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मेरठ, गोरखपूर, सहारनपूर, हापुड, बिजनौर, मथुरा, मुजफ्फरनगर आणि आग्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. मेरठमध्ये जमावाने चार बसेस जाळल्या. दुकानांची तोडफोड तसेच पोलीस स्टेशनची जाळपोळ केली.

यावेळी आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलावर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्याने जमाव अधिक आक्रमक झाला. त्यामुळे पोलिसांनी मुरैनात जमावबंदीचा आदेश जारी केला.
राजस्थानात बाडमेर येथे दलित संघटना आणि करणी सेना यांच्यात झालेल्या चकमकीत २५ जण जखमी झाले. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पंजाबमध्ये शाळा, महाविद्यालये, बससेवा, इंटरनेट बंद आहे. सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.