कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काल मध्यप्रदेश येथे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सहभाग घेतला.
तामिळनाडू येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा हळूहळू पुढे सरकत आहे. ज्या ज्या राज्यांतून ही यात्रा गेली, त्या ठिकाणच्या अनेक प्रादेशिक पक्षांनी या यात्रेत सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता गोवा फॉरवर्डनेही या यात्रेत सहभाग नोंदवला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे निमंत्रण आणि गेल्या विधानसभा निवडणुकीतील मित्र पक्ष म्हणून गोवा फॉरवर्डने कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आहे. आजच्या काळात एकात्मतेचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. यावेळी सरदेसाई यांच्या समवेत दुर्गादास कामत, दीपक कळंगुटकर व इतरांची उपस्थिती होती.