जिल्हा न्यायालयाने सीबीआयला फटकारले

0
6

>> पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणातील मूळ तक्रार प्रत सादरीकरणात दिरंगाई

पणजी पोलीस स्थानकावरील २००८ मधील हल्ला प्रकरणातील मूळ तक्रारीची प्रत सादर करण्यात सीबीआय अपयशी ठरल्याने काल जिल्हा व सत्र न्यायालयाने सीबीआयला फटकारले. पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी सुनावणी आता २ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी सीबीआयने पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रावर सुनावणी सुरू झाली आहे. विद्यमान महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात व इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कालच्या सुनावणीला मंत्री मोन्सेरात व इतर उपस्थित होते.

या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्या वकिलांनी या प्रकरणात ज्या तक्रारींच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला होता, ती तक्रार आपणाला अजून देण्यात आलेली नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

ही प्रत देण्यासाठी न्यायालयाने सीबीआयला २१ दिवसांची मुदत दिली होतीज्ञ मात्र तरीही सीबीआयने कालच्या सुनावणीवेळी सदर प्रत सादर केली नाही. न्यायमूर्तीनी या प्रकाराची गंभीर नोंद घेतली असून, २ डिसेंबरला होणार्‍या पुढील सुनावणीच्या वेळी तक्रारीची मूळ प्रत सादर करण्याचा निर्देश दिले आहेत. सीबीआयच्या दिरंगाईमुळे या प्रकरणाच्या सुनावणीला उशीर होत आहे. या प्रकरणी आणखीन उशीर केल्यास सीबीआयवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.