भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळविला जाणार आहे. कोरोना माहामारीत होणार्या या मालिकेत ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल. मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयंक अगरवाल हा शिखर धवनसह डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. लोकेश राहुल याच्या खांद्यावर यष्टिरक्षणाची जबाबदारी असल्याने तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरेल. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह या दोन्ही आघाडीच्या गोलंदाजांसह उतरल्यास भारताला नवदीप सैनीचा वेग व शार्दुल ठाकूरची वैविध्यता यांच्यातील एकाची निवड करावी लागेल. आयपीएलमधील फॉर्मच्या बळावर युजवेंद्र चहल संघातील एकमेव मनगटी फिरकीपटू असेल. त्याच्या जोडीला अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल. तंदुरुस्तीनंतर हार्दिक पंड्याने नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नव्हती. आज ऑस्ट्रेलियाने एखाच्या गोलंदाजाला लक्ष्य केल्यास हार्दिक पंड्या गोलंदाजी करेल का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे संघाचा योग्य समतोल साधणे आवश्यक आहे. हार्दिक गोलंदाजीसाठी सक्षम नसेल तर सहाव्या स्थानासाठी मनीष पांडे अधिक उपयुक्त ठरू शकतो. सिडनीची खेळपट्टी प्रथम फलंदाजी करणार्या संघाला अधिक मदत करले. मागील सात पैकी सहा सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे.
दुसरीकडे कन्कशनमुळे इंग्लंडमधील मालिकेला मुकलेला स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलिया संघात ‘नंबर ३’ ची जागा पुन्हा आपल्या नावे करणार आहे. चार स्पेशलिस्ट गोलंदाज व ग्लेन मॅक्सवेल व मार्कुस स्टोईनिस यांच्या रुपात दोन अष्टपैलूंसह ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणे शक्य आहे. मार्नस लाबुशेन याच्या रुपात खमकी फलंदाज मधल्या फळीत असल्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर चिंतेचे कारण नाही. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड या त्रिकुटाकडे जगातील बलाढ्य फलंदाजी फळी उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे रोहितविना दुबळी बनलेल्या भारताच्या फलंदाजी फळीला जपून रहावे लागेल.
भारत संभाव्य ः मयंक अगरवाल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संभाव्य ः डेव्हिड वॉर्नर, ऍरोन फिंच, स्टीव स्मिथ, मार्नल लाबुशेन, मार्कुस स्टोईनिस, ग्लेन मॅक्सवेल, आलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ऍडम झॅम्पा व जोश हेझलवूड.