Home बातम्या भारतीय चित्रपटांचा शतकमहोत्सव

भारतीय चित्रपटांचा शतकमहोत्सव

0

प्रा. मिलिंद म्हाडगुत

भारतीय चित्रपट यंदा शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. १९१३ साली निर्माण झालेल्या ‘राजा हरिश्‍चंद्र’पासून सुरुवात केलेला आपला भारतीय चित्रपट आता ‘रोबोट’, ‘रावण’सारख्या हॉलिवूडच्या चित्रपटांच्या तोंडात मारण्याएवढा प्रगत झालेल्या चित्रपटांपर्यंत पोचलेला आहे. आजचा आपला हिंदी चित्रपट केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशांतसुद्धा लोकप्रिय व्हायला लागला आहे.

या शतकमहोत्सवी वर्षात अनेक चित्रपटांची, अनेक चित्रपटमहर्षींची आपल्याला याद यायला लागते. राजकपूर, व्ही. शांताराम व मेहबुब ही यातली तीन ठळक नावे. या तिघांनीही भारतीय चित्रपटांना एक नवे परिमाण दिले. राजकपूरचा ‘आवारा’ हा त्याकाळात केवळ भारतातच नव्हे तर रशियासारख्या परदेशातसुद्धा तुफान गाजला होता. या चित्रपटातले ‘घर आया परदेसी’ हे स्वप्नगीत आजसुद्धा एक माईलस्टोन दृश्य म्हणून वाखाणले जाते. ‘आवारा’बरोबर ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘बूट पॉलिश’, ‘जिस देश में गंगा बहती है’ या राजकपूरच्या चित्रपटांनी त्याकाळी लोकांना अक्षरशः वेड लावले होते.

राजकपूरच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी आपल्या चित्रपटांद्वारा कला आणि व्यवसाय यांची सांगड घातली. ‘मेरा नाम जोकर’ हा असाच आणखी एक त्यांचा कलात्मक चित्रपट. त्या काळात तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी त्यातली मूल्ये आजही मनाला भावतात. या चित्रपटाचे पहिले दोन भाग उत्कृष्ट होते. खास करून आईचे प्रेत विंगेत असताना स्टेजवर येऊन ‘हॉं बाबू ये शो है तीन घंटे का’ म्हणत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा जोकर राजकपूर म्हणजे कलात्मकतेचा उत्कृष्ट आविष्कार समजला जातो.

व्ही. शांताराम यांनीही अशाच अजरामर कलाकृती दिलेल्या आहेत. सुरुवातीचे त्यांचे ‘कुंकू’ (हिंदी- ‘दुनिया न माने’), ‘माणूस’ (हिंदी- ‘आदमी’) व ‘शेजारी’ (हिंदी- ‘पडोसी’) हे मराठी चित्रपट आजसुद्धा चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ समजले जातात. त्यानंतरचे त्यांचे ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, ‘दहेज’, ‘झनक झनक पायल बाजे’ व चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन ‘दो आँखे बारह हाथ’ हेही चित्रपट चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अजरामर झालेले आहेत. ‘दो आँखे बारह हाथ’मधले ते सहा भयानक कैदी व त्यांना सुधारणारा जेलर जबरदस्त परिणाम करून गेला होता. या चित्रपटातले ‘ये मालिक तेरे बंदे हम’ हे गाणे तर पाकिस्तानातसुद्धा प्रार्थना म्हणून लोकप्रिय झाले होते.

मेहबुब यांनीही ‘अंदाज’, ‘जान’, ‘अनमोल घडी’सारखे बेमिसाल चित्रपट दिले असले तरीसुद्धा ते जास्त लक्षात राहिले ते ‘मदर इंडिया’ या चित्रपटामुळे. ऑस्कर ऍवॉर्डचा पहिला नॉमिनी असलेला हा चित्रपट आजसुद्धा सर्वश्रेष्ठ चित्रपटांच्या यादीत गणला जातो.

गुरूदत्त हेही खरे तर याच तीन महान दिग्दर्शकांच्या पठडीतले. ‘प्यासा’सारखे तरल काव्य रुपेरी पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक म्हणून आजही गुरुदत्तांचे नाव घेतले जाते. ‘कागज के फुल’ हा त्यांचा पुढचा चित्रपटही असाच अद्भुत आविष्कार होता. पण तो काळाच्या पुढे असल्यामुळे लोकांच्या पचनी पडू शकला नाही. या चित्रपटाच्या अपयशामुळे गुरुदत्त खचले व नंतर ६४ व्या साली आत्महत्या करून मोकळे झाले. साठ-सत्तरच्या दतकांत विजय आनंद, गुलजार, हृषिकेश मुखर्जी या प्रतिभावंत दिग्दर्शकांचे नाव घ्यावे लागेल. विजय आनंदचा ‘गाईड’, हृषिकेश मुखर्जींचा ‘सत्यकाम’ व आनंद गुलजारचे ‘कौशिश’ व ‘अचानक’ या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेले यात शंकाच नाही. तसे या शतकांत बरेच अजरामर चित्रपट निर्माण झाले. पण तरीही ‘शोले’ व ‘मोगले आझम’ या चित्रपटांनी आपला असा जो काही शिक्का मारला आहे तो पुसायचा म्हटला तरी पुसता येणार नाही.

‘शोले’ हा त्याकाळात सलगपणे सहा वर्षे चालला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील वीरू, बसंती, जय, ठाकूर, राधा, गब्बर या प्रधान भूमिकांएवढ्याच मौसी, अनवर, चाचा, असरानीचा जेलर यांसारख्या छोट्या भूमिकासुद्धा अजरामर झाल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा एकमेव चित्रपट ज्याच्या संवादाच्या ध्वनिफिती गाण्यांपेक्षा जास्त लोकप्रिय झाल्या होत्या. गब्बरच्या तोंडी असलेले ‘कितने आदमी थे’, ‘गॉंव में बच्चा रोता है’सारखे संवाद त्याकाळात बच्याबच्यांच्या तोंडी ऐकू येत होते. ‘मोघले आझम’ हा तर चित्रपटसृष्टीतील अद्भुत आविष्कार मानला जातो. तब्बल आठ वर्षे निर्मिती अवस्थेत असलेल्या या चित्रपटाने त्या काळात सर्व विक्रम मोडीत काढले होते.

पृथ्विराज कपूरचा ‘अकबर’, दिलीप कुमारचा ‘सलीम’ व मधुबालेची ‘अनारकली’ यांच्याबरोबर दिग्दर्शक के. आसीफनेही आपली छाप सोडली होती. नायकांबाबत बोलायचे झाल्यास सुरुवातीचे अशोक कुमार, के. एन. सैगल, मोतीलाल, नंतरचे दिलीपकुमार, राजकपूर, देव आनंद, राजेंद्रकुमार, शम्मीकपूर, राजकुमार, सत्तरीच्या दशकातले राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन, हल्लीचे आमीर खान, शाररुख खान हे नायक जास्त लक्षात राहिले. राजेंद्रकुमार हा पहिला ज्युबिली स्टार ठरला होता. त्याच्या २६ चित्रपटांनी लागोपाठ महोत्सवी यश प्राप्त केले होते. ६९ ते ७४ हा काळ सुपरस्टार राजेश खन्नाचा होता. या पाच वर्षांत या सुपरस्टारने न भुतो न भविष्यती एवढी लोकप्रियता मिळविली होती. ७१ साली त्याचे ‘आनंद’, ‘आन मिलो सजना’, ‘कटी पतंग’, ‘हाथी मेरे साथी’, ‘अंदाज’ व ‘मर्यादा’ हे सहा चित्रपट एकापाठोपाठ एक ज्युबिली हिट ठरले होते.

अमिताभ बच्चन हा ७३ सालच्या ‘जंजीर’पासून प्रकाशात आला व नंतर त्याने गगनात न मावण्याएवढे यश मिळविले. विशेष म्हणजे अजूनही हा ‘बिग बी’ तेवढाच लोकप्रिय आहे. नायिकांबाबत बोलायचे तर सुरुवातीच्या देविकाराणी, सुरय्या, लीला चिटणीस, नंतरच्या मीनाकुमारी, मधुबाला, नर्गिस, नूतन, साधना, वहिदा रेहमान, वैजयंतीमाला, माला सिन्हा, शर्मिला टागोर, नंदा, जया भादुरी, हेमा मालिनी, रेखा, राखी, आशा पारेख तर हल्लीच्या ऐश्‍वर्या रॉय, करिना कपूर, विद्या बालन यांनी भरपूर लोकप्रियता मिळविली आहे. पण तरीही मधुबाला, मीनाकुमारी, नर्गिस, वहिदा यांनी त्या काळात खर्‍या अर्थी नायिकायुग आणले होते. खरे तर आपला चित्रपट- खास करून हिंदी चित्रपट- हा नायकप्रधान चित्रपट म्हणून ओळखला जातो. नायकांभोवती इर्द-गिर्द फिरणे एवढेच नायिकेचे काम असते. पण तरीही वर नमूद केलेल्या नायिकांनी तसेच सत्तर-ऐंशीच्या दशकांतल्या शबाना आझमी, स्मिता पाटील, रेखा या नायिकांनी नायिकाप्रधान चित्रपट यशस्वी करून दाखविले.

शबाना आझमीचा ‘अर्थ’, स्मिताचा ‘चक्र’ व मराठी चित्रपट ‘उंबरठा’, रेखाचा ‘उमराव जान’ ही नायिकाप्रथान चित्रपटांची उत्कृष्ट उदाहरणे म्हणून देता येतील. तरीसुद्धा नायिकाप्रधान चित्रपटांना नायकप्रधान चित्रपटांएवढे घवघवीत यश मिळू शकले नाही हेही तेवढेच खरे. आपल्या चित्रपटांत संगीत हा महत्त्वाचा घटक असतो. ‘इतफाक’, ‘कानून’सारखे काही गाणेविरहित चित्रपट निर्माण झाले असले तरीसुद्धा गाण्यांना आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच शंकर-जयकिशन, नौशाद, सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ओ. पी. नय्यर यांच्यासारखे संगीतकार नायक-नायिकांपेक्षाही महत्त्वाचे ठरले. ‘नया दौर’ या बी. आर. चोप्रांच्या चित्रपटात दिलीपकुमार-वैजयंतीमालासारखे हिट नायक-नायिका असूनसुद्धा खरा हिरो ठरला होता तो संगीतकार ओ. पी. नय्यर. ‘उडी जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, ‘मॉंग के साथ तुम्हारा’सारख्या या चित्रपटातील गाण्यांवर त्या काळात चित्रपटगृहात दौलतजादा होत असे. ‘अलबेला’ हा मा. भगवान यांचा चित्रपट हिट केला तो संगीतकार सी. रामचंद्र यांनी. ‘शोला जो भडके’ वा ‘भोली सुरत दिल के खोटे’सारखी कॉकटेल गाणी आजसुद्धा ऐकली की पाय थिरकायला लागतात.

या सगळ्या संगीतकारांनी आपापल्या कामात भरपूर लोकप्रियता मिळविली असली तरी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून शंकर-जयकिशन या जोडीचेच नाव घ्यावे लागेल. ‘बरसात’पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेल्या या जोडीने मनोजकुमार, राजेंद्रकुमार, शम्मी कपूरसारख्या अनेक नायकांना ‘सुपरहिट’ बनविले. ‘शंकर-जयकिशन’ हा त्या काळात परवलीचा शब्द होता. चित्रपटाच्या नायकांपेक्षाही ते जास्त मानधन घेत असत. हल्लीच्या चित्रपट संगीतात मात्र पूर्वीचा दम राहिलेला नाही. खरे तर ‘शोले’पासून संगीताचे महत्त्व कमी व्हायला लागले. अमिताभ बच्चनच्या उत्तुंग लोकप्रियतेपुढे संगीताला मान झुकवावी लागली होती. आजही संगीताची तीच अवस्था आहे.

खलनायकांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळविली ती प्राणने. तरीसुद्धा पूर्वीचे याकुव व आताचे अमरीशपुरी यांनीही खलनायक म्हणून चांगलीच लोकप्रियता प्राप्त केली होती. विनोदी नायकांत मेहमूद, किशोरकुमार व जॉनी वाकर यांना अजूनही तोड सापडलेली नाही. ‘चलती का नाम गाडी’ हा अशोककुमार-किशोरकुमार-अनुपकुमार या तीन गांगुली ब्रदर्स अभिनित हिंदी चित्रपट हा आतापर्यंतचा सर्वांत जास्त यशस्वी विनोदी चित्रपट म्हणून गणला जातो. खलनायिकांत ललिता पवार व शशिकला यांच्या स्थानांना अजूनही धक्का पोचलेला नाही. गायकांत महंमद रफी, मुकेश व किशोरकुमार यांचे स्थान अजूनही अबाधित आहे. पूर्वीच्या काळात के. एन. सैगल यांनी आपले असे स्थान निर्माण केले होते. गायिकांत लता मंगेशकर व आशा भोसले या मंगेशकरभगिनी अजूनही सर्वश्रेष्ठ समजल्या जातात. ‘अल्लाह तोरो नाम’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले ‘हम दोनो’ चित्रपटातले भजन आजही तिचे सर्वश्रेष्ठ गाणे म्हणून मानले जाते.

या शतकमहोत्सवी वर्षात मराठी चित्रपटानेही आपले असे स्थान निर्माण केले आहे. पूर्वीचे राजा परांजपे दिग्दर्शित ‘ऊन पाऊस’, ‘पेडगावचे शहाणे’ वा ‘जगाच्या पाठीवर’ हे चित्रपट आजही उत्कृष्ट चित्रपटांच्या सदरात मोडले जातात. दादा कोंडके व सुषमा शिरोमणी यांनी मराठी चित्रपटांना एक व्यावसायिक वळण दिले हेही नाकारता येत नाही. दादा कोंडकेंनी तर एकापाठोपाठ एक असे नऊ चित्रपट महोत्सवी करून आपले नाव गिनिझ बुकात कोरले होते. नंतर महेश कोठारे व सचिन पिळगावकर यांनीही मराठी चित्रपटांना एक नवा आयाम दिला. सचिनचा ‘अशी ही बनवाबनवी’ तर महेश कोठारेंचा ‘थरथराट’ हे चित्रपट मराठीतील उत्कृष्ट विनोदी चित्रपट मानले जातात. व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट उत्कृष्ट क्लासिक चित्रपटांत मोडला जतो. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटापेक्षाही जास्त कमाई केली होती. आतासुद्धा ‘श्‍वास’, ‘डोंबिवली एक्स्प्रेस’, ‘साताच्या आत घरात’सारखे दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, आजचा मराठी चित्रपट दिवसेंदिवस आशयप्रधान बनत चालला आहे.

बंगाली दिग्दर्शक सत्यजीत रे यांनीही आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविली होती. त्यांचा ‘पथेर पांचाली’ हा जगातील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून गणला जातो. हिंदीत सत्यजीत रे यांनी ‘सतरंज के खिलाडी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. संजीवकुमार, बलराज सहानीसारखे कोणत्याही भूमिकेत चपखलपणे बसणारे अष्टपैलू अभिनेतेही या शतकात बघायला मिळाले.

गाण्याचे ‘टेकिंग’ हीही आपल्या चित्रपटांची खासियत मानली जाते. उत्कृष्ट टेकिंगचा विचार केल्यास बरीच गाणी आठवतात. पण हिंदी चित्रपटातला सर्वोत्कृष्ट टेकिंगचा आविष्कार ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या राजकपूरच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटातील गाण्यात पाहायला मिळतो. मुसळधार पाऊस, एका छत्रीत बिलगून चाललेली राजकपूर-नर्गिसची जोडी, भुरके मारीत चहा पिणारा तो चहावाला, रेनकोट घालून रस्त्यावरून चाललेली ती तीन लहान मुले व शंकर-जयकिशनचे भन्नाट संगीत यामुळे या गाण्याला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली आहे.

‘क्या से क्या हो गया’ (गाईड) व ‘दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हो’ (प्यासा) ही दोन गाणीही उत्कृष्ट टेकिंगचा आविष्कार पेश करतात. ‘जग हे बंदिशाला’ (जगाच्या पाठीवर) या गाण्यात राजा परांजपेंनी आपला ‘टच’ दाखविला आहे. तसे पाहायला गेल्यास या शतकात अनेक चांगले चित्रपट निर्माण झाले. अनेकांनी आपले भावविश्‍व समृद्ध केले. जगण्याची एक नवी प्रेरणा दिली.

गोमंतकीय चित्रपटांतही पूर्वीचे आमचे ‘नशीब’, ‘मजी घरकान’, ‘निर्मोण’, तर हल्लीचे ‘पलतडचो मनीस’, ‘सॉवरिया डॉट कॉम’सारखे चांगले कोंकणी चित्रपट निर्माण झाले. तरीसुद्धा एकंदर विचार करता आपली भारतीय चित्रपटसृष्टी यशाच्या उत्तुंग क्षितिजावर विहार करीत असताना आपली गोमंतकीय चित्रपटसृष्टी त्यामानाने बरीच मागे पडलेली दिसून येत आहे. आठ इफ्फी होऊनही गोमंतकीय चित्रपटसृष्टी राष्ट्रीय प्रवाहात येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल. पण काही का असेना, आज बॉलिवुडात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मनोरंजनाची नवीन परिभाषा तयार होऊ लागली आहे. म्हणूनच शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या भारतीय चित्रपटांना उद्देशून आपण एवढेच म्हणू शकतो-

मंजिले और भी है, रास्ते और भी है, देखना जोर बाजूएँ कितना अपने फिल्मों में है…..