‘भारतीय घटना वाचवा’ रॅलीचे कॉंग्रेसतर्फे २८ रोजी आयोजन

0
127

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे येत्या २८ डिसेंबर २०१९ रोजी पणजी शहरात कॉंग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त ‘भारत वाचवा, भारतीय घटना वाचवा’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने दुरुस्ती केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) निषेध काल करण्यात आला. तसेच सीएए दुरुस्ती मागे घेण्याची मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. सीएएमुळे देशाच्या घटनेला धोका निर्माण झाला आहे. भाजपच्या राजवटीत आर्थिक मंदी, महागाई, महिलांवर अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात केंद्र सरकारने सीएए लागू केला आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला तडा बसला आहे. याविरोधात २८ डिसेंबरला कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त देशातील प्रमुख शहरात रॅली काढण्यात येणार आहेत. गोवा प्रदेश समितीतर्फे संध्याकाळी ३.३० वाजता पणजी शहरात रॅली काढली जाणार आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या इमारतीजवळून रॅलीला प्रारंभ केला जाणार असून आझाद मैदानावर समाप्ती केली जाणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

सीएएचा केवळ मुस्लीम समाजातील व्यक्तींना नव्हे तर हिंदू समाजातील गरीब, आदिवासी, दलित, बहुजन समाजातील लोकांना फटका बसू शकतो. गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्या नागरिकांना फटका बसू शकतो. गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांच्या हितरक्षणार्थ केंद्र सरकारने खास कायदा तयार करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

सीएएच्या समर्थनार्थ पणजी आणि मडगाव येथे आयोजित सभांना भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती लावली नाही. भाजपमधील अल्पसंख्याक समाजातील आमदार व मंत्र्यांनी सीएएबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी केली.

सीएए आणि एनआरसी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. केंद्र सरकारने एनआरसीला मदत करण्यासाठी येत्या एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) कामाला सुरुवात केली जाणार आहे. या सर्वेक्षणावर ३४९४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शिक्षणासाठीचा निधी सर्वेक्षणाच्या कामासाठी वळविण्यात येणार आहे, असा आरोप डिमेलो यांनी केला.