भारतासाठी विजय आवश्यक

0
128

>> वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळविला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला नमवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेला विंडीजचा संघ ऐतिहासिक मालिका विजयासाठी सज्ज झाला असून आव्हान कायम राखण्यासाठी भारतासमोर विजयाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

मार्च महिन्यात भारताला मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून द्विपक्षीय वनडे मालिकेत ३-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने मागील १५ वर्षांत मायदेशात सलग दोन द्विपक्षीय मालिका गमावलेल्या नाहीत त्यामुळे भारताला हा नकोसा विक्रम होण्यापासून रोखण्यासाठी आज जिंकावेच लागणार आहे. संघाचा समतोल हा भारतासाठी सर्वांत चिंतेचा विषय ठरत आहे. आघाडी फळीतील एकही फलंदाज कामचलाऊ गोलंदाजी करण्यास असमर्थ असल्यामुळे या चिंतेत भर पडत आहे. शिवम दुबे व केदार जाधव या प्रामुख्याने फलंदाजासाठी संघात असलेल्या खेळाडूंना पहिल्या सामन्यात पाचव्या गोलंदाजाची भूमिका वठवावी लागली होती. याचाच फायदा विंडीजने उठवला होता. टी-ट्वेंटीसाठी दुबे योग्य ठरत असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विंडीजसारख्या स्फोटक फलंदाजी फळीसमोर किमान सात-आठ षटके गोलंदाजी करण्याची क्षमता दुबेकडे सध्यातरी नाही. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी दुबेला वगळून युजवेंद्र चहलच्या रुपात स्पेशलिस्ट गोलंदाज खेळविणे फायद्याचे ठरू शकते.

विंडीज संघाचा विचार केल्यास पहिल्या सामन्यातील धडाकेबाज विजयामुळे त्यांचा संघ सुखावला आहे. सहा स्पेशलिस्ट गोलंदाज व कर्णधार कायरन पोलार्डच्या रुपात उपयुक्त अष्टपैलू त्यांच्या संघात आहे. एक टोक लावून धरून दुसर्‍या टोकाने फलंदाजांना मुक्तपणे खेळण्यास वाव देण्याचे काम शेय होपने पहिल्या सामन्यात केले. वेळप्रसंगी आक्रमकता देखील तो दाखवू शकतो. आपल्या यष्टिरक्षणातही त्याने कमालीची सुधारणा केल्याने विंडीजसाठी ही जमेची बाजू ठरत आहे. पाचव्या स्थानावर फलंदाजी करणारा कसोटीतील स्पेशलिस्ट फिरकीपटू रॉस्टन चेज याच्यामुळे विंडीजचा संघ समतोल बनतो. दहा षटकांचा कोटा पूर्ण करतानाच उपयुक्त धावा करण्याची क्षमता त्याने आपल्या छोटेखानी वनडे कारकिर्दीतही दाखवून दिली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात तो फलंदाजीत संघाच्या कामी नक्की येऊ शकतो. आक्रमक इविन लुईस तंदुरुस्त ठरल्यास सलामीला सुनील अंबरिसची जागा तो घेऊ शकतो. या स्थितीत लुईस, हेटमायर व पूरन हे तीन डावखुरे फलंदाज आघाडीच्या चारमध्ये असतील. त्यामुळे चांगल्या ऑफस्पिनरची उणीव टीम इंडियाला जाणवू शकते.

भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी व युजवेंद्र चहल.

विंडीज (संभाव्य) ः शेय होप, इविन लुईस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रॉस्टन चेज, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर, अल्झारी जोसेफ व शेल्डन कॉटरेल.