भारताला चित्रिकरणाचे हब बनवणार ः ठाकूर

0
13

>> ताळगाव येथे ५३ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची शानदार सोहळ्याने सुरुवात

>> सुप्रसिद्ध स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक, कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार

>> पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांना जाहीर

भारत हा चित्रिकरणासाठीचे स्थळ व पोस्ट प्रॉडक्शनसाठीचे हब बनवण्यासाठीचे काम केंद्र सरकारने हाती घेतलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर भारत हा चित्रपट क्षेत्रातील विश्‍वगुरू बनेल असा विश्‍वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल व्यक्त केला. काल ताळगाव येथे ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी गोवा राज्य हे चित्रिकरणासाठीचे एक आघाडीचे स्थळ व पोस्ट प्रॉडक्शनसाठीचे हब बनवण्यात येणार आहे. गोवा हे भविष्यात माहिती तंत्रज्ञान तसेच मनोरंजनासाठीचेही जागतिक स्थळ बनेल व त्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती दिली.
दोनापावला येथे उभारण्यात येत असलेले इफ्फीसाठीचे नवे केंद्र २०२५ पर्यंत पूर्ण होणार असून त्यावेळचा इफ्फी या नव्या स्थळी आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

काल रविवारी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ५३व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
जीवन गौरव पुरस्कार प्रदान
यावेळी सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध स्पॅनिश फिल्ममेकर कार्लुस सौरा यांना देण्यात आला. अनारोग्यामुळे ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नसल्याने त्यांची कन्या ऍना सौरा यांनी हा पुरस्कार त्यांच्यावतीने मंत्री ठाकूर यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी श्री. सौरा यांची एका व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या ५३व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना मंत्री ठाकूर यांनी, येणार्‍या २५ वर्षांच्या काळात म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारतीय सिनेमाने खूप पुढची झेप घेतलेली असेल व हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काम करत असल्याचे स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवात भारत हा बहुमानाचा देश होता ही भारतासाठी गौैरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

७५ फिल्ममेकर्सचा सहभाग
नव्या दमाच्या फिल्ममेकर्ससाठी ७५ क्रिएटिव्ह माईंड्‌स ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्याद्वारे निवडण्यात आलेल्या ७५ गुणी फिल्ममेकर्सना इफ्फीत सहभागी करून घेण्यात आले असल्याचे यावेळी ठाकूर यांनी सांगितले. त्यांना आपले कलागुण दाखवून देण्याचे व्यासपीठ इफ्फीने दिले असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. गोवा हे इफ्फीसाठीचेे एक सुंदर स्थळ असून त्याला पर्याय नसल्याचेही मत यावेळी मंत्री ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, गोव्याचे सुंदर समुद्र किनारे व निसर्ग हा पर्यटकांबरोबरच चित्रपट निर्मात्यांनाही भुरळ घालू लागलेला आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे गोवा इफ्फीसाठीचे कायम स्थळ बनले आहे असे सांगितले. इफ्फीसाठी पंतप्रधान मोदींचे सहकार्य लाभत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री मुरुगन, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचीही यावेळी भाषणे झाली.
केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी स्वागत केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या इफ्फीसाठीच्या संदेशाचे वाचन केले.
यावेळी अभिनेते सुनील शेट्टी, अजय देवगण, मनोज वाजपेयी, परेश रावल, चित्रपट लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचा त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना यावेळी पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी लर्व्ड सिनेमा विभाग आणि पॅनोरमा विभागाच्या ज्युरींचाही सन्मान करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यात शेवटी झालेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सारा अली खान, वरुण धवन आदींनी नृत्यसादर केले. सूत्रसंचालन अभिनेते अमरशक्ती खुराना यांनी केले.

मणिपूर चित्रपटाची पन्नाशी

यंदाच्या इफ्फीत मणिपूर सिनेमाची पन्नाशी साजरी करण्यात येणार आहे. असे सांगून हा प्रादेशिक सिनेमाचा बहुमान असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. यासाठी विशेेष खेळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गोव्यासाठी विशेष विभाग

यंदाच्या इफ्फीत गोव्यासाठी एक विशेष विभाग सुरू करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगून, त्यात ६ शॉर्ट फिल्म्स व एका माहितीपटाचा समावेश असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.