भारताने सप्टेंबरमध्येच कोरोनाचे शिखर ओलांडले?

0
96

>> उपलब्ध आकडेवारीच्या विश्लेषणाअंती अर्थ मंत्रालयाचा दावा

कोरोना रुग्णसंख्येचे शिखर भारताने सप्टेंबरमध्येच गाठले असावे अशी शक्यता अर्थ मंत्रालयाने आजवरच्या उपलब्ध आकडेवारीच्या विश्‍लेषणानंतर व्यक्त केली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या पूर्वीपेक्षा बर्‍याच प्रमाणात कमी दिसत असून त्यामुळे वरील अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी अद्याप देशातील कोरोनाची साथ संपलेली नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होणे याचाच दुसरा अर्थ देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दिशेेने पावले पडत आहेत असे अर्थ मंत्रालयाला वाटते. सामाजिक दूरीपेक्षाही आता स्वतःचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले गेले पाहिजे असे अर्थ मंत्रालयाने आपल्या मासिक अहवालात नमूद केले आहे.

१७ ते ३० सप्टेंबर या चौदा दिवसांच्या काळात दैनंदिन कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण सुमारे ९३ हजारांवरून ८३ हजारांवर आले आहे, तर दैनंदिन चाचण्यांची सरासरी १ लाख १५ हजारांवरून १ लाख २४ हजारांवर गेली आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सोमवारपर्यंत देशामधील कोरोना रुग्णांची संख्या ६६ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ७४,४४२ नवे रुग्ण आढळले, तर ९०३ जण मृत्युमुखी पडले. ६६ लाख रुग्णांपैकी वर्तमान रुग्णांची संख्या नऊ लाख ३४ हजार ४२७ आहे. ५५ लाख ८६ हजार ७०४ जण आजवर बरे झाले आहेत.

रविवारी चाचण्यांच्या प्रमाणातही वाढ दिसून आली. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या प्रमाणाच्या सहा पट चाचण्या भारतात होत आहेत. काही राज्यांची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात रोज जगातील सर्वाधिक कोविड चाचण्या होत असल्याचा सरकारचा दावा आहे, मात्र, चाचण्यांचे प्रमाण अद्यापही कमी असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. देशात सध्या १६२३ कोविड प्रयोगशाळा असून १०२२ सरकारी, तर ६०१ खासगी आहेत.