भारताने पहिल्यांदाच पटकावला थॉमस चषक

0
30

>> स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सुवर्णपदक; लक्ष्य, सात्विकसाईराज-चिराग, श्रीकांत ठरले शिल्पकार

थॉमस चषक २०२२ च्या अंतिम सामन्यात काल भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास रचला. भारताने रविवारी सलग तिसर्‍या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस चषक २०२२ चे विजेतेपद पटकावले. भारताने पहिले तीन सामने जिंकून १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी ३-० असा पराभव केला. भारतासाठी लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीमध्ये आणि किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात आपापले सामने जिंकले. यासह भारताने प्रथमच थॉमस चषक पटकावला. भारताने बॅडमिंटनमधील थॉमस चषक स्पर्धेत ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक पटकावले. एम आर. अर्जुन, ध्रुव कपिला व एच. एस. प्रणॉय हे देखील विजयाचे शिल्पकार ठरले.

भारताचा पहिला सामना लक्ष्य सेन आणि इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींग यांच्यामध्ये झाला. या सामन्यात पहिला गेम सेनने गमावला होता; पण त्यानंतर जोरदार पुनरागमन करत त्यानंतरचे दोन्ही गेम्स त्याने जिंकले आणि दमदार पुनरागमन केले. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला.
दुहेरीतही भारताकडून अशीच गोष्ट पाहायला मिळाली. कारण भारताचे सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी हे दोघेही पिछाडीवर होते; पण सात्विक व चिराग यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन केले. मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांच्या विरुद्धचा दुसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला; पण भारतीय जोडीने दुसरा आणि तिसरा गेम जिंकला आणि हा सामना १८-२१, २३-२१, २१-१९ असा जिंकून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये एकूण पाच सामने होणार होते; पण त्याधील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यामुळे भारताने यापुढे जर एक सामना जिंकला असता तर त्यांना हे सुवर्णपदक मिळणार होते. त्यामुळे आता तिसर्‍या लढतीवर सर्वांचे लक्ष लागलेले होते.
भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत हा यावेळी कोर्टवर उतरणार होता. श्रीकांतला यावेळी जोनाथन ख्रिस्टीशी दोन हात करायचे होते. हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. श्रीकांतने पहिला गेम २१-१५ असा सहजपणे जिंकला. त्यामुळे श्रीकांत हा सामना जिंकेल, असे सर्वांना वाटत होते; पण जोनाथन ख्रिस्टीने यावेळी दमदार खेळत करत श्रीकांतबरोबर १८-१८ अशी बरोबरी केली; पण त्यानंतर श्रीकांतने आपला अनुभव पणाला लावत दुसरा गेम २३-२१ असा जिंकत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकवून दिले.
थॉमक चषक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारताने उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता. तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक पक्के केले होते, परंतु त्यांनी थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर तगड्या १४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाचे आव्हान होते; मात्र भारतीय संघाने सुरेख खेळ करत इंडोनेशियाचा पराभव केला.

थॉमस कप या स्पर्धेची संकल्पना सर जॉर्ज ऍलन थॉमस यांच्या सुपिक डोक्यातून आली. ते मागील शतकातील इंग्लंडचे दिग्गज बॅडमिंटनपटू होते. टेनिसमधील डेव्हिस कप (१९००), फुटबॉलमधील विश्‍वचषक (१९३०) यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांची संकल्पना १९३९ साली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या सर्वसाधारण सभेत स्वीकारण्यात आली. सर जॉर्ज थॉमस हे टेनिस तसेच बुद्धिबळ खेळाडू होते. त्यांनी दोनवेळा ब्रिटिश चेस चॅम्पियनशीप व २१ वेळा ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. १९११ साली झालेल्या विंबल्डन स्पर्धेत त्यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व तर पुरुष दुहेरीची उपांत्य फेरीदेखील गाठली होती.