>> भारत बायोटेकची दुसरी चाचणी यशस्वी
भारतात भारत बायोटेक आयसीएमआरसोबत एकत्र येऊन तयार करत असलेल्या कोरोनावरील लशीची दुसर्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे.
कंपनीने पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील कोरोना लशीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती मागील महिन्यात भारत बायोटेककडून देण्यात आली होती. दरम्यान, आता २६ हजार स्वयंसेवकांवर या लशीची तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्ये डीजीसीआयकडे लशीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती.
दरम्यान, कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या फार्मा कंपनीने केला असून कोरोनावर ९४ टक्के ती प्रभावी असल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे. लशीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे.