भारतातील पहिला कोरोना विषाणूचा बळी कर्नाटकात

0
133

>> कर्नाटकातील कलबुर्गी येथील ७६ वर्षीयाचे निधन

भारतातील कोरोना विषाणूचा पहिला बळी कर्नाटक राज्यातील ७६ वर्षीय एक वृद्ध ठरला आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या संशयावरून सदर व्यक्तीला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा निश्‍चित अहवाल आला होता असे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामलू यांनी कोरोनासंबंधात राज्यात सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले. कोरोनामुळे मृत झालेला सदर वृद्ध कलबुर्गी येथील होता. तो अलीकडेच सौदी अरेबियातून भारतात आला होता. मंगळवारी त्याचे निधन झाले.

कोरोनामुळे मरण पावलेल्या वृद्धाला अन्य काही समस्या होत्या. उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा अशा व्याधी त्याला होत्या अशी माहिती देण्यात आली.

पार्थिवाच्या सर्व प्रक्रियांची पूर्तता
कर्नाटकचे संयुक्त आरोग्य संचालक बी. जी. प्रकाश कुमार यांनी मृत व्यक्तीच्या पार्थिवाच्या विल्हेवाटीच्या शिष्टाचाराच्या सर्व प्रक्रियांची पूर्तता करण्यात आली आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार्थिवाचे निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला अनुसरून त्यांनी ही माहिती दिली.
तेलंगण राज्यातही
गेला होता रुग्ण
सदर वृद्ध याआधी तेलंगण राज्यातही गेला होता. त्यामुळे त्याबाबतची माहिती तेलंगण सरकारला देण्यात आली असल्याचे प्रकाशकुमार यांनी सांगितले. सदर वृद्ध तेथील एका खाजगी इस्पितळात गेला होता. सदर वृद्ध गेल्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस सौदी अरेबियात गेला होता व २९ फेब्रुवारी रोजी भारतात परतला होता. परतला त्यावेळी त्याला ताप होता. त्यामुळे त्याने खाजगी इस्पितळात उपचार घेतले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तो हैदराबादला गेला होता.

देशातील कोरोना
रुग्णांची संख्या ७४ वर
नवी दिल्ली ः लेह येथे काल कोरोना विषाणूची बाधा एका व्यक्तीला झाल्याचे निश्‍चित झाल्यानंतर देशातील अशा रुग्णांची संख्या ७४ झाल्याचे सांगण्यात आले. लेह येथे याआधी दोन कोरोना रुग्ण निश्‍चित झाले होते.