भारताच्या चौदाव्या राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद

0
283

भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मीराकुमार यांचा पराभव केला. कोविंद यांना एकूण २९३० मते मिळाली, ज्यांचे मत मूल्य ७ लाख २ हजार ४४ असून त्यांच्या विरोधक मीराकुमार यांना १८४४ मते प्राप्त झाली, ज्यांचे मत मूल्य ३ लाख ६७ हजार ३१४ आहे.

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत असून २५ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अधिकारपदाची शपथ देतील. यापूर्वीचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही २५ जुलै २०१२ रोजी पदभार स्वीकारला होता.
आपला विजय हा दीनदलितांचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपतीपदी निवड झालेले रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतीपद ही फार मोठी जबाबदारी असून आपण ती निष्पक्षपणे पार पाडू अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. राधाकृष्णन, डॉ. कलाम व प्रणव मुखर्जी यांच्या परंपरेत पाय ठेवणे गौरवास्पद असल्याचे ते उद्गारले.
मीराकुमार यांच्याकडून अभिनंदन
दरम्यान कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. सध्याच्या आव्हानात्मक वातावरणात आता घटनेची प्रतिष्ठा अबाधित राखण्याची जबाबदारी राष्ट्रपती म्हणून कोविंद यांच्यावर आहे असे त्या म्हणाल्या.

कोण आहेत रामनाथ कोविंद?
राष्ट्रपतीपदी निवड झालेले रामनाथ कोविंद हे या निवडणुकीत उतरण्यापूर्वी बिहारचे राज्यपाल होते. केशरीनाथ त्रिपाठी यांच्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीनंतर १६ ऑगस्ट २०१५ ते २० जून २०१७ पर्यंत कोविंद यांनी बिहारचे राज्यपालपद सांभाळले.
१ ऑक्टोबर १९४५ रोजी जन्मलेले कोविंद आता ७१ वर्षांचे आहेत. आजच्या उत्तर प्रदेशमधील कानपूर देहातमधील परौंख गावी त्यांचा दलित समाजामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी होते.
कोविंद यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आणि डीएव्ही कॉलेजमधून त्यांनी एलएलबी पदवी मिळवली. त्यानंतर नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी ते दिल्लीला गेले. तिसर्‍या प्रयत्नात ती परीक्षा ते उत्तीर्णही झाले, परंतु आयएएसऐवजी अन्य सेवेत समावेश झाल्याने त्यांनी त्या क्षेत्रात प्रवेश केला नाही.
दिल्लीत त्यांनी वकिली सुरू केली. दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. सर्वोच्च न्यायालयात १९८० ते ९३ या काळात त्यांनी केंद्र सरकारचे वकील म्हणूनही काम केले. १९९३ पर्यंत जवळजवळ सोळा वर्षे त्यांनी वकिली केली. दिल्लीत मोफत कायदा सेवा योजनेखाली गोरगरिबांना कायदेशीर सल्ला देण्याचे कामही त्यांनी केले.
कोविंद हे सुरवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांचे व्यक्तिगत सहायक म्हणून कोविंद यांची नेमणूक झाली होती. राजकारणात ते सक्रिय होते.