भारताच्या गटात बलाढ्य इराण

0
109

एएफसी अंडर १६ चॅम्पियनशीप फायनल्स फुटबॉल स्पर्धेलाठी भारताचा ‘सी’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या इराण, व्हिएतनाम व इंडोनेशिया यांचादेखील समावेश आहे. मलेशिया येथे २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत सदर स्पर्धा खेळविली जाणार आहे. क्वालालंपूर येथे काल गुरुवारी ‘एएफसी’च्या मुख्यालयात या स्पर्धेचा ‘ड्रॉ’ काढण्यात आला. स्पर्धेच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.

नेपाळ येथे मागील वर्षी झालेल्या एएफसी अंडर १६ पात्रता स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून भारताने मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. आपल्या चमकदार कामगिरीने या स्पर्धेत अचंबिक करणारे काही निकाल नोंदविले होते. या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात भारताने बलाढ्य इराणला गोलशून्य बरोबरीत रोखण्याची कामगिरी केली तर पहिल्या सामन्यात नेपाळला २-२ असे बरोबरीत रोखल्यानंतर पॅलस्टाईनचा ३-० असा फडशा पाडला होता. एएफसी अंडर १६ फायनल्ससाठी पात्र ठरण्याची मागील चार सत्रांतील भारताची ही तिसरी वेळ आहे.

‘ए’ गटात यजमान मलेशिया, जपान, थायलंड व ताजिकिस्तान हे देश आहेत. उत्तर कोरियासह ओमान, येमेन व जॉर्डन यांना ‘बी’ गटात ठेवण्यात आले आहे तर ‘डी’ गटात इराक, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.