भारताची लढत आज बलाढ्य घानाशी

0
110

अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गेल्या दोन सामन्यात आकर्षक खेळ करीत तमाम देशवासियांकडून कौतुकाची थाप घेतलेल्या भारतीय संघाशी लढत आज बलाढ्य घानाशी होणार आहे. भारताचे लक्ष्य विजयासह आपली या स्पर्धेत छाप कायम ठेवणे हे असेल. तर घाना पूर्ण गुणांसह बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल.
पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळताना भारताची आतापर्यंच्या दोन्ही सामन्यातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. जरी त्यांनी पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून ३-० हार पत्करली, तरी दुसर्‍या लढतीत कोलंबियाला कडवी झुंज दिलेली आहे. या सामन्यात भारतीय संघाने बरोबरीची संधी गमावली होती. जॅकसन सिंगने कोलंबियाविरुद्ध गोल नोंदवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली होती. परंतु या बरोबरीनंतर गाफिल राहिल्याने त्यांना १ -२ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारतीय संघ ‘अ’ गटात गुणतक्त्यात तळाला आहे. परंतु आपल्या शेवटच्या सामन्यात तो घानाचे समिकरण बिघडवू शकतो. घाना बलाढ्य संघ आहे. परंतु कोलंबियाविरुद्धच्या सामन्यातील भारतीय संघाचा खेळ बघितल्यास ते त्यांना कमी लेखणार नाही हे निश्‍चित. घानाला बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताविरुद्ध विजयाची नितांत गरज आहे.