भारताची मदार सिंधूवर

0
103

>> ‘चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर १०००’ बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

विश्‍व विजेती पी.व्ही. सिंधू आजपासून सुरू होणार्‍या १,०००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ‘चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर १०००’ स्पर्धेतील भारताचे प्रमुख आशास्थान असेल. हैदराबादच्या सिंधूसमोर किचकट ‘ड्रॉ’ असून पहिल्याच फेरीत तिला माजी क्रमांक एकची खेळाडू व माजी ऑलिंपिक विजेत्या चीनच्या ली शुरेई हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

विशेष म्हणजे २०१२ साली सिंधूने तत्कालीन ऑलिम्पिक विजेत्या ली हिला चायना मास्टर्स स्पर्धेत दणका देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली दखल घ्यायला संपूर्ण जगाला भाग पाडले होते. यानंतर सिंधूने बॅडमिंटनमध्ये यशाची नवनवीन शिखरे गाठली तर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे शुरेईच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. जागतिक क्रमवारीत शुरेई विसाव्या स्थानी असली तरी सिंधूविरुद्ध तिचा रेकॉर्ड ३-३ असा आहे. या वर्षीच्या सुरुवातीला सिंधूने शुरेईला पराभूत केले होेते. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास तिचा सामना कॅनडाच्या मिचेल ली हिच्याशी होऊ शकतो. मिचेलने सिंधूला २०१४ सालापासून पराभूत केलेले नाही. सर्वकाही सिंधूच्या मनाप्रमाणे घडल्यास उपांत्यपूर्व फेरीत सिंधूला चीनची तृतीय मानांकित व ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई हिच्याशी झुंजावे लागू शकते.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील सायना नेहवालदेखील या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. सातत्याच्या दुखापतीमुळे तिला यंदाच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत सायनाने चांगली सुरुवात केली होती. परंतु, मिया ब्लिचफेल्टविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे तिला दुसर्‍याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. सायना आपल्या मोहिमेची सुरुवात थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्याविरुद्ध करेल. सायनाने आपल्या खराब फॉर्ममवर मात करत आगेकूच केली तर उपांत्यपूर्व फेरीत तिला ताय त्झू यिंग या तैवानच्या दिग्गजाशी सामना करावा लागू शकतो. तायविरुद्ध सायनाचा रेकॉर्ड ५-१५ असा आहे. मागील तेरा लढतीत सायनाला तायला नमविता आलेले नाही.

चायना ओपन ही वर्ल्ड टूर सीरिजमधील शेवटची ‘सुपर १०००’ स्पर्धा असून या स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक विजेती व तीनवेळची विश्‍वविजेती कॅरोलिना मरिन व २०१७चा विश्‍वविजेता व्हिक्टर एक्सेलसन पुनरागमन करणार आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत व एस.एस. प्रणॉय यांच्या माघारीमुळे भारताला फारशा अपेक्षा नाहीत. श्रीकांतची गुडघ्याची दुखापत विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत बळावली तर प्रणॉय डेंग्यूमुळे आजारी आहे. त्यामुळे बी. साई प्रणिथच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी असेल. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून त्याने पुरुष एकेरीतील भारताचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. भारताचा हा प्रतिभासंपन्न खेळाडू थायलंडच्या सुपान्यू अवहिंगसन याच्याविरुद्ध आपला पहिली लढत खेळणार असून दुसर्‍या फेरीत चीनच्या तिसर्‍या मानांकित शी यु की याच्याशी त्याची लढत संभविते. राष्ट्रकुलचा माजी विजेता पारुपल्ली कश्यप देखील आपले नशीब आजमावणार असून मागील काही महिन्यांपासूनची त्याची खराब कामगिरी पाहता त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा नाही. फ्रान्सच्या ब्राईस लेवेरडेझला नमवून पहिल्या फेरीचा अडथळा पार करणे त्याला सोपे जाणार नाही.

दुखापतीतून सावरल्यानंतर सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी कोर्टवर परतणार आहे. मागील महिन्यात थायलंड ओपन जिंकून ‘सुपर ५००’ दर्जाची स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली पुरुष जोडी होण्याचा मान त्यांनी मिळविला होता. कॅनडाच्या जेसन अँथनी हो शूई व निल याकुरा यांच्याशी ते पहिल्या फेरीत लढतील. मिश्र दुहेरीत सात्विक-अश्‍विनी पोनप्पा यांचा सामना सहाव्या मानांकित प्रवीण जॉर्डन व मालती देवा ओक्तावियांती या सहाव्या मानांकित इंडोनेशियन जोडीशी होईल. मनू अत्री व सुमीथ रेड्डी या दुकलीसमोर पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकित मोहम्मद एहसान व हेंड्रा सेटियावान यांचे कडवे आव्हान असेल.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जोडी असलेल्या अश्‍विनी व सिक्की रेड्डी यांना तैवानच्या चेंग ची या व ली चिह चेन यांचा तर सिक्की-प्रणव जेरी चोप्रा यांना जर्मनीच्या मार्क लामसफस व इसाबेल हर्टिच यांचा सामना करावा लागणार आहे.

गोव्याचे संदीप हेबळे
संघ व्यवस्थापक
गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांची भारतीय बॅडमिंटन महासंघाने चायना ओपन व यानंतर होणार्‍या कोरिया ओपनसाठी संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड केली आहे. त्यामुळे ते संघासोबत आहेत. याव्यतिरिक्त प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद व इंडोनेशियाचे ड्वी क्रिस्टियावान संघाला मार्गदर्शन करणार आहेत.