भारताचा मलेशियावर ५-१ असा विजय

0
115

अझलान शहा हॉकी स्पर्धेमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचा ५-१ अशा गोल फरकाने धुव्वा उडवला आहे. दोन गोल करणारा गुरजंत सिंग सामन्याचा नायक ठरला. भारताचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. याआधी दोन सामन्यात पराभव आणि एक सामन्यात बरोबरीवर भारताला समाधान मानावे लागले होते.

भारतीय संघाने मलेशियाला सुरुवातीपासून दबावात ठेवले. पहिल्या सत्रातील १० व्या मिनिटाला शिलानंद लाकडाने गोल करत भारताचे खाते उघडले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत भारताने ही आघाडी कायम ठेवली होती. मध्यंतरानंतर तिसर्‍याच मिनिटाला मलेशियाच्या फैझल सारीने गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र या गोलनंतर बिथरलेल्या भारतीय खेळाडूंनी आक्रमकतेची कास धरत झंझावाती खेळाचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना घडवले. ४२व्या मिनिटाला गुरजंत सिंगने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुमित कुमारने ४८व्या, रमणदीप सिंग ५४ आणि गुरजंत सिंगने ५७व्या मिनिटाला गोल करत भारताचा ५-१ असा मोठा विजय साकार केला. अंतिम फेरीच्या आशा यापूर्वीच मावळलेल्या भारतीय संघासाठी कालचा विजय दिलासा देणारा ठरला आहे. भारत आपला शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध ९ रोजी खेळणार आहे.