भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

0
105
द. आफ्रिकेवरील विजयानंतर जल्लोष करताना भारतीय खेळाडू. सोबत सामनावीर शिखर धवन

विश्‍वचषक दावेदारांना इशारा : शिखर धवन सामनावीर
पारंपरिक कडव्या प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शुभारंभी लढतीत लोळवल्यानंतर एमसीजी मैदानावर सर्वांग सुंदर सांघिक खेळाच्या जोरावर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर देखणा व ऐतिहासिक विजय नोंदवीत विद्यमान जगज्जेत्या टीम इंडियाने जगज्जेतेपद राखण्यासाठी यावेळीही आपण एक दावेदार असल्याचा सज्जड इशाराच अन्य दावेदारांना दिला. द. आफ्रिकेवरील रोमांचक विजयाचा शिल्पकार ठरला तो तडाखेबंद शतक (१३७) ठोकलेला सलामीवीर शिखर धवन.
सलामी फलंदाज रोहित शर्मा धावचित झाल्यानंतर शिखर धवन, विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांची हुकुमी फलंदाजी, शामी, मोहीत शर्मा व रवीचंद्रन आश्‍विन यांची धारदार गोलंदाजी व त्याला मिळालेली चपळ क्षेत्ररक्षणाची जोड अशा सांघिक सर्वांगसुंदर खेळाचे दर्शन एमजीसी स्टेडियमवर उपस्थित असलेले सुमारे ८६ हजार प्रेक्षक तसेच जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून घडले.या विजयामुळे ब गटात गुण तक्त्यात भारत ४ गुणांसह अग्रस्थानी आहे. प्रथम फलंदाजीस उतरल्यानंतर धवन (१३७), विराट कोहली (४६) व अजिंक्य राहणेने ३ उत्तुंग षट्‌कार व ७ खणखणीत चौकारांसह ठोकलेल्या ७९ धावांच्या जोरावर भारताने निर्धारीत ५० षट्‌कात ७ बाद ३०७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर विजयासाठी ३०८ धावांचे आव्हान नजरेसमोर ठेवून फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला रविचंद्रन आश्‍विन (३ बळी) व मोहीत शर्मा आणि महम्मद शामी (प्रत्येकी २ बळी) यांनी आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर ४० षट्‌कात १७७ धावात गुंडाळले. जडेजानेही एक बळी मिळवला. ३ बाद १०८ अशा स्थितीनंतर द. आफ्रिकेचे ७ गडी अवघ्या ४४ धावात गारद झाले. त्यांचे दोन गडी धावचित झाले. प्रतिस्पर्धी कर्णधार ए. बी. डिविलियर्स स्वत: व डेव्हीड मिलर हे धावचित झाले. ही बाब सामन्याला कलाटणी देणारी ठरली अशी प्रतिक्रिया दस्तुरखुद्द डिविलियर्सने व्यक्त केली.
आतापर्यंत विश्‍व चषक स्पर्धांमध्ये भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन लढती झाल्या होत्या. त्या सर्व सामन्यात भारताच्या वाट्याला पराभवच आला. विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वांत मोठा पराभव ठरला आहे. यामुळेही भारताच्या कालच्या विजयाला आगळी किनार लाभली आहे.
टिम इंडियाचा सलग दुसरा विजय, धवनचे धडाकेबाज शतक
दक्षिण आफ्रिकेवर १३० धावांनी मात; रहाणेही चमकला
डावखुरा सलमीवीर शिखर धवनचे दमदार शतक, अजिंक्य रहाणेच्या ७९ धावा अणि अश्विनसह इतरांच्या सूत्रबद्ध गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्व चषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक पराभव करण्याची किमया साधली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावांचे आव्हान उभारले. तर प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आल्याने त्यांना १३० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. १३७ धावांची शतकी खेळी केलेल्या धवनची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
टीम इंडियाकडून मिळालेल्या ३०८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघाला ४०.२ षट्‌कांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारता आली. ३०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात एकदम खराब झाली. सलामीवर क्वींटन दी कॉक केवळ ७ धावा जोडून तंबूत परतला. मोहम्मद शामीने भारताला पहिले यश मिळवून देताना कॉकला कोहलीकरवी झेल बाद केले. हाशिम आमला (२२) मोहित शर्माच्या गोलंदाजीवर शामीकडे झेल देऊन परतला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केलेला फाफ दु प्लेसिस आणि कर्णधार अब्राहम डीविलियर्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसर्‍या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी करीत संघाला शंभरीच्या पार नेले. मोहित शर्माने अचूक फेकीवर डीविलियर्सला (३०) परतीची वाट दाखवित ही जोडी फोडली. फाफ दु प्लेसिस मोहितच्या गोलंदाजीवर शिखर धवनकडे झले देऊन बाद झाला. डेव्हिड मिलरने २२ तर वायन पारनेलने नाबाद १७ धावा जोडल्या. भारताच्या अचूक मार्‍यापुढे इतर फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू न शकल्याने दक्षिण आफ्रिकेला विश्व चषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाज भारताविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. यापूर्वी तीनही वेळी दक्षिण आफ्रिकन संघ भारतावर वरचढ ठरला होता. भारतातर्फे रविचंद्र अश्विनने सर्वाधिक ३ तर मोहम्मद शामी व मोहित शर्मा यांनी २ व रवींद्र जडेजाने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताने शिखर धवनच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर ७ गडी गमावत ३०७ अशी धावसंख्या उभारली. भारताच्या डावाचीही सुरुवात एकदम खराब झाली. रोहित शर्मा शून्यावर धावचित झाल्याने टीम इंडियाला प्रारंभीच धक्का बसला. परंतु त्यानंतर धवन व विराट कोहली यांनी डाव सावरताना दुसर्‍या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. इम्रान ताहिरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात कोहली (४६) फाफ दु प्लेसिसकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर धवनने अजिंक्य रहाणेच्या साथीत तिसर्‍या विकेटसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. वायने पारनेलने ही जोडी फोडली. १४६ चेंडूत १६ चौकार आणि २ षट्‌कारांच्या साहाय्याने १३७ धावांची शतकी खेळी केलेला धवन आमलाकडे झेल देऊन परतला. विश्‍वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुध्द सर्वाधिक धावा काढणारा तो पहिला तर शतक नोंदविणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने २०११च्या विश्व चषकात १११ धावांची खेळी केली होती. तसेच मेलबर्न क्रिकेट मैदानावर शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सौरव गांगुली आणि रोहित शर्माने हा कारनामा केला आहे.
धवन बाद झाल्यानंतर सुरेश रैना (६) मोठा फटका मारण्याच्या नादात झेल देऊन फसला. त्यानंतर रहाणेही ७ चौकार आणि ३ षट्‌कारांच्या साहाय्याने ७९ धावांची अर्धशतकी खेळी करून बाद झाला. कर्णधार धोनीने ११ चेंडूत १८ धावांची भर घातली आणि ५० षटकांच्या अखेरीस धावफलकावर टीम इंडियाने ३०७ अशी मोठी धावसंख्या उभारली.
धावफलक,
भारत: रोहित शर्मा धावचीत अब्राहम डीविलियर्स ०, शिखर धवन झेल हाशिम आमला गो. वायन पारनेल १३७, विराट कोहली झेल फाफ दु प्लेसिस गो. इम्रान ताहिर ४६, अजिंक्य रहाणे पायचीत डेल स्टेन ७९, सुरेश रैना झेल गो. मॉर्न मॉर्केल ६, महेंद्रसिंह धोनी झेल क्वींटन दी कॉक गो. मॉर्न मॉर्केल १८, रवींद्र जडेजा धावचीत अब्राहम डीविलियर्स २, रविचंद्र अश्विन नाबाद ५, मोहम्मद शामी नाबाद ४.
अवांतर: १०. एकूण ५० षट्‌कांत ७ बाद ३०७ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १/९ (रोहित शर्मा, २.५), २/१३६ (विराट कोहली, २७.१), ३/२६१ (शिखर धवन, ४३.४), ४/२६९ (सुरेश रैना, ४४.५.), ५/२७८ (अजिंक्य रहाणे, ४६.०), ६/२८४ (रवींद्र जडेजा, ४७.२), ७/३०२ (महेंद्रसिंह धोनी, ४८.५)
गोलंदाजी: डेल स्टेन १०/१/५५/१, वेर्नोन फिलँडर ४/१/१९/०, जेपी ड्यूमिनी ७/०/३९/०, मॉर्न मॉर्केल १०/०/५९/२, इम्रान ताहिर १०/०/४८/१, वायन पारनेल ९/०/८५/१.
दक्षिण आफ्रिका: हाशिम आमला झेल मोहम्मद गो. मोहित शर्मा २२, क्वींटन दी कॉक झेल विराट कोहली गो. मोहम्मद शामी ७, फाफ दु प्लेसिस झेल शिखर धवन गो. मोहित शर्मा ५५, अब्राहम डीविलियर्स धावचीत मोहित शर्मा ३०, डेव्हिड मिलर धावचीत उमेश यादव २२, जेपी ड्यूमिनी झेल सुरेश रैना गो. रविचंद्र अश्विन ६, वायन पारनेल नाबाद १७, वेर्नोन फिलँडर पायचीत रविचंद्र अश्विन ०, डेल स्टेन झेल शिखर धवन गो. मोहम्मद शामी १, मॉर्ने मॉर्केल त्रिफळाचीत रविचंद्र अश्विन २, इम्रान ताहिर पायचीत रवींद्र जडेजा ८.
अवांतर: ७. एकूण ४०.२ षट्‌कांत सर्वबाद १७७ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १/१२ (क्वींटन दी कॉक, ३.३), २/४० (हाशिम आमला, १०.२), ३/१०८ (अब्राहम डीविलियर्स, २२.५), ४/१३३ (फाफ दु प्लेसिस, २८.१), ५/१४७ (जेपी ड्यूमिनी, ३१.३), ६/१५३ (डेव्हिड मिलर, ३३.४), ७/१५३ (वेर्नोन फिलँडर, ३४.०), ८/१५८ (डेल स्टेन, ३६.२), ९/१६१ (मॉर्न मॉर्केल, ३७.२), १०/१७७ (इम्रान ताहिर, ४०.२)
गोलंदाजी: उमेश यादव ६/०/३४/०, मोहम्मद शामी ८/१/३०/२, मोहित शर्मा ७/०/३१/२, रवींद्र जडेजा ८.२/०/३७/१, रविचंद्र अश्विन १०/०/४१/३, सुरेश रैना १/०/३/०.
पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवरील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे ट्विटरवर अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटरवर लिहिलेय की, ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी, चांगले खेळलात, टीम इंडियाचे अभिनंदन, तुमच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे’. यापूर्वी पाकिस्तानवरील विजयानंतरही पंतप्रधानांनी टीम इंडियाला शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला होता.
याव्यतिरिक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन व बॉलीवूड व क्रीडा क्षेत्रातील अन्य व्यक्तीनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.