भारताचा आफ्रिकेवर १८९ धावांनी विजय

0
79

बंगालचा जलदगती गोलंदाज ईशान पोरल याच्या चार बळींच्या जोरावर भारताने अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषकाच्या सराव लढतीत काल मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा १८९ धावांनी पराभव केला. आर्यन जुयल (८६) व हिमांशू राणा (६८) यांच्या अर्धशतकावर आरुढ होत निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३३२ धावा जमवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव १४३ धावांत गुंडाळला. पोरलने आपल्या ८ षटकांत केवळ २३ धावांच्या मोबदल्यात ४ फलंदाजांना माघारी पाठवत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला कर्णधार पृथ्वी शॉ (१६) व मनोज कालरा (३१) यांनी ५४ धावांची सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेचा मध्यमगती गोलंदाज अखोना मनयाका याने शॉ व शुभम गिल यांना दोन चेंडूंच्या अंतराने व यानंतर पुढील दहा चेंडूंनंतर कालराचा बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकलले. आर्यन व हिमांशू यांनी यानंतर भारताचा कोसळता डोलारा सावरला. प्रत्येकी आठ चौकार व षटकारासह या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सुरुवातीला धैर्याने सामने केला व खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर आक्रमकतादेखील दाखवली. तळाला अभिषेक शर्मा (१९ चेंडूंत ३५), अनुकूल रॉय (२१ चेंडूंत २८) व कमलेश नागरकोटी (१७ चेंडूंत नाबाद २६), शिवा सिंग (६ चेंडूंत १०) व शिवम मावी (४ चेंडूंत नाबाद १०) यांनी वेगाने धावा जमवून भारताला त्रिशतकी वेस ओलांडून दिली.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडू केवळ जॉन ड्युप्लेसिस याने ८२ चेंडूंचा सामना करताना अर्धशतक झळकावले. याव्यतिरिक्त त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून पोरलव्यतिरिक्त शिवा सिंग (९-२), कमलेश नागरकोटी (१५-२) व अभिषेक शर्मा (१६-२) यांनी प्रभावी मारा केला.

दिवसातील दुसर्‍या सराव सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडने आयर्लंडचा १२५ धावांनी पाडाव केला. इंग्लंडने ८ बाद ३७२ धावा जमवताना आयर्लंडचा डाव २४७ धावांत गुंडाळला. तिसर्‍या लढतीत कॅनडाने केनियावर ८ गड्यांनी मात केली. केनियाने विजयासाठी ठेवलेले १६५ धावांचे लक्ष्य कॅनडाने केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्यात दिवसातील चौथा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात श्रीलंकेला ५३ धावांनी पराजित केले. २५२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला १९८ धावांपर्यंतच मजल मारता आली.