भाभासुमंची आज मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सभा

0
99

>>मतदारसंघातील १० गावांतून पाच हजारांची उपस्थिती अपेक्षित

इंग्रजी प्राथमिक शाळांचे शैक्षणिक माध्यम अनुदान सरकारने मागे घ्यावे या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचाने पुकारलेल्या निर्णायक आंदोलनाचा एक भाग म्हणून आजपासून मतदारसंघनिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिली जाहीर सभा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघात आयोजित करण्यात आली असून या सभेला मतदारसंघातील १० गावांतून पाच हजार मातृभाषाप्रेमी नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती भाभासुमंचे मांद्रे प्रभाग सचिव श्री. गजानन मांद्रेकर यांनी ‘नवप्रभा’ ला दिली.

आज रविवार दि. २४ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मांद्रे येथील मांद्रे हायस्कूलच्या पटांगणावर देशी भाषाप्रेमींची ही जाहीर सभा होणार असून या सभेला अपेक्षेनुरूप प्रतिसाद लाभेल असा विश्वास श्री. मांद्रेकर यांनी व्यक्त केला.
मांद्रे येथे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्याने आणि या सभेला भाजप कार्यकर्त्यांनी जाऊ नये असे निरोप मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांकडून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना दिले गेले आहेत. परंतु तरीही मतदारसंघातील सर्व १० गावांतील मातृभाषाप्रेमी या सभेला निश्‍चित येतील असे श्री. मांद्रेकर म्हणाले. त्यासाठी नागरिकांनी गावागावातून स्वतःहून वाहनांची व्यवस्था केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. या सभेला मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांनी येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या असून केवळ मतदारसंघातूनच मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असेल असे त्यांनी सांगितले.
या सभेची पूर्वतयारी म्हणून मतदारसंघात दहा हजार पत्रके वितरित करण्यात आली असून गावोगावी सुमारे शंभर बैठका आतापावेतो घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिला, माजी विद्यार्थी, मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती आदींचाही समावेश आहे. हा विषय जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे गेला असून ही सभा पूर्ण यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने चालविलेली चालूगिरी आता जनतेला कळली असून मांद्रे मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणात या सभेला उपस्थित राहील, असे श्री. मांद्रेकर म्हणाले. मांद्रे येथील या सभेत सुभाष वेलिंगकर, सुभाष देसाई, ऍड. उदय भेंब्रे, प्रा. अनिल सामंत, पुंडलिक नाईक, अरविंद भाटीकर, ऍड. स्वाती केरकर व प्रा. गजानन मांद्रेकर संबोधित करतील असे भारतीय भाषा सुरक्षा मंचाने कळविले आहे.
अनुदान रद्द करणे अशक्य : मुख्यमंत्री
मागील सरकारने इंग्रजी शाळांना सुरु केलेले शैक्षणिक माध्यम अनुदान रद्द करणे आपल्या सरकारला शक्य नाही. मातृभाषांसाठी आमचे सरकार जे जे शक्य आहे. ते करीत आहे. परंतु पूर्वीचे अनुदान बंद करा असा आग्रह धरणे इतरांच्या दृष्टीने योग्य असले तरी सरकारला सर्व समाजसघटकांचा विचार करावा लागतो. सरकारने नव्याने अनुदान दिलेले नाही.
नव्या इंग्रजी शाळांना मान्यताही दिलेली नाही. सरकार चालते ते कोणत्या घटकाने किती टक्के मते दिली यावरून चालत नाही. विविध धर्माची जनता येथे सलोख्याने राहते. सामाजिक सलोख्यासाठी आमचा गोवा ओळखला जात आहे. तो सलोखा कायम राहावा यासाठी अनुदान निर्णयात बदल शक्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आदेशामुळे मांद्रे येथील भाभासुमंच्या सभेला जाणे मला शक्य नाही. माझी भूमिका उत्तरेत एक व दक्षिणेत एक अशी बदलत नाही. सर्वत्र मी एकच भूमिका मांडत आलो आहे. ही भूमिका भाभासुमंच्या सभेला जाऊन त्या व्यासपीठावरून मांडणे मला योग्य वाटत नाही, असे मुख्यमंत्री श्री. पार्सेकर म्हणाले.

पुढची सभा साखळीत

भारतीय भाषा सुरक्षा मंचाने राज्यातील भाजपच्या सर्व २१ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याचे ठरविले असून त्यानुसार पुढील सभा दि. ३० एप्रिल रोजी साखळी येथे आमदार प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात घेण्यात येणार आहे. त्यानंतर ८ मे रोजी सांगे येथे, १५ मे रोजी शिरोडा येथे व २१ मे रोजी मये येथे जाहीर सभा होतील. या चार सभांची जोरदार तयारी सुरू असून त्यानंतर पुढील सभांचे वेळापत्रक ठरेल.