भाभासुमंचा भाजपवर निवडणुकीत परिणाम होणार नाही : तेंडुलकर

0
79

लोकशाहीत कोणालाही पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे. येत्या निवडणुकीत मोन्सेर्रातांचा पक्ष, गोवा फोरवर्ड, आप, गोवा विकास, भाभासुमं असे किमान दहा पक्ष असतील. या सर्व पक्षांकडे संघर्ष करून भाजप निवडणूक लढवातील व २०१७ त राज्यात भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा दावा भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला.

भाभासुमंने भाजप विरोधात निवडणूक लढविली तरी त्याचा काहीही परिणाम नाही. भाजपने साडे चार वर्षांच्या काळात केलेल्या विकासाच्या बळावर निवडणूक लढविली जाईल. त्यामुळे भाजप विजयी होईल यात संशय नाही, असे ते म्हणाले. जनमत कौल घेऊन कॅसिनो हटविणे शक्य नाही, असे सांगून प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष विनोद करीत असल्याचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर यांनी यावेळी सांगितले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची
आमदार, मंत्र्यांसह आज बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आज शनिवार दि. १७ रोजी संध्याकाळी ४ वा. येथील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात भाजप प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा, मंडळ, मंत्री, आमदार व अन्य आघाडी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यक्रमाचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टीकोनातून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक मार्गदर्शन करीतल, अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. गेल्या ऑगस्ट महिन्यात पक्षाने अनेक उपक्रम राबविले होते. आता पक्ष पुन्हा सक्रीय झाला आहे असे, सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी सांगितले. रविवार दि. १८ रोजी सकाळी १० वा. येथील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात महिला मोर्चा, जिल्हा व मंडळ महिला समित्यांची बैठक आयोजित केली असून दि. २ ऑक्टोबरपासून ३ दिवस राबविण्यात येणार्‍या स्वच्छ भारत मोहिमेसंबंधी महिलांना मार्गदर्शन केले जाईल. यावेळीही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रदेश अध्यक्ष, आमदार उपस्थित राहतील.
युवा मोर्चा मेळावा
त्याच दिवशी दुपारी ३ वा. मिनेझिस ब्रागांझा सभागृहात युवा मोर्चाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर मार्गदर्शन करतील, सुमारे ५०० युवा कार्य, कार्यकर्त्यांचा हा मेळावा असेल, असे तानावडे यांनी सांगितले. दि. २ ऑक्टोबर रोजी राज्यातील युवा कार्यकर्ते गोवाभर स्वच्छ गोवा अभियान राबवतील, असे त्यांनी सांगितले.