भाजप, कॉंग्रेसचे सभापतीपदाचे उमेदवार आज अर्ज भरणार

0
125

गोवा विधानसभेच्या सभापतींची निवड करण्यासाठी मंगळवार ४ जून २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता विधानसभेचे खास अधिवेशन घेतले जाणार असून आज सोमवारी ३ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सभापती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना गती प्राप्त झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्ष सभापतिपदासाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या तयारीला लागले आहेत.

भाजपमध्ये सभापतिपदासाठी चुरस लागलेली आहे. भाजपच्या प्रदेश समितीने सभापतीसाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. सभापतिपदासाठी भाजपचे डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांचे नाव घेतले जात होते. परंतु, आता शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांचेही नाव चर्चेत आहे. सभापतिपदी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विद्यमान उपसभापती तथा कार्यवाहू सभापती मायकल लोबो यांनी आपण सभापतीपदासाठी इच्छुक नसल्याचे याआधीच जाहीरपणे सांगितले आहे.

कॉंग्रेस पक्ष सभापतिपदासाठी आपला उमेदवार सोमवारी निश्‍चित करणार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक आज सोमवार ३ रोजी सकाळी ९.३० घेतली जाणार आहे. या बैठकीत सभापतिपदासाठी उमेदवार निश्‍चित करून उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.