भाजपाविरोधात सर्वांनी महायुती करावी : पटेल

0
67

‘एकला चलो’चा विचार न करता सर्व विरोधी राजकीय पक्षांनी येथील भाजपा सरकारच्या विरोधात संघटित होऊन महायुतीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी इतर पक्षांनी विचार करून पुढील निर्णय घ्यावा तेव्हाच राज्यात सुरक्षित सरकार स्थापन करण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रफूल्ल पटेल यांनी काल वास्कोत केले.

वास्को येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित राष्ट्रवादी प्रदेश कॉंग्रेस समिती आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पटेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केरळ अध्यक्ष मुजावर विजयन, केरळचे वाहतुकमंत्री ए. के. शशिद्रन, महाराष्ट्राचे आमदार तथा गोवा प्रभारी नवाब मलिक, गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, उपाध्यक्ष देवानंद नाईक, जॉर्ज बार्रेटो, अभिजीत धारगळकर, प्रितम नाईक, राखी देसाई, प्रशांत लोटलीकर, नॅनी डिसोझा, अविनाश भोसले, स्वप्नील तळकर, प्रफूल हेदे तसेच श्रीलंका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष डिसिल्वा व आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे पटेल म्हणाले की, गोवा सद्या विकासाच्या बाबतीत शून्य आहे. मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षणमंत्री झाले. वाटले होते गोव्यासाठी भरपूर विकास योजना राबवतील, बेकारांना रोजगार मिळवून देतील पण त्यांचा गोव्याला काही एक फायदा झाला नाही. केंद्रात भाजपाने भ्रष्टाचार चालवला आहे तसाच गोव्यातही चालवलेला आहे. देशाबरोबर गोव्याची स्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानाच्या भ्याड हल्ल्याने देश हादरला आहे पण भाजपा सरकार बरोबर संरक्षण खाते निद्रीस्त आहे. देशाच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलणे नितांत गरज आहे. देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आम्हीही बरोबर आहोत. देशाच्या हितासाठी सरकार सोबत आम्ही राहणार. पण त्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलून काश्मिर खोर्‍यात होत असलेले हल्ले परतवून लावण्यास पुढाकार घेणे तितकेच गरजेचे असल्याच ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे गोव्याचे प्रभारी नवाब मलिक यांनी १० वर्षे कॉंग्रेसबरोबर युती होती. भाजपाने गेम करून ती तोडून राज्यात सरकार स्थापन केले पण जनतेला दिलेली आश्‍वासने मात्र पूर्ण करू शकले नाही असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केरळ अध्यक्ष मुजावर विजयन, केरळचे वाहतूक मंत्री ए. के. शशिद्रन यांचीही भाषणे झाली.