भाजपशी युती तोडून मगोने स्वबळावर लढाव

0
94

>> भाभासुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांचे फोंड्यातील सभेत आवाहन; मगो मंत्री, आमदार उपस्थित

 

मगो पक्षाने भाभासुमंला संपूर्ण पाठिंबा देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मातृभाषांच्या रक्षणासाठी स्वाभिमानी मगोने आता भाजपबरोबर केलेली दूषित युती तोडून आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून पुन्हा मगोला सत्तेवर आणावे असे आवाहन भाभासुमंचे सन्मवयक प्रा. सुभाष वेलिंकर यांनी काल संध्याकाळी फर्मागुडी येथे झालेल्या जाहीर सभेत केले. या सभेला मंत्री तथा मगोचे आमदार दीपक ढवळीकर भाषाप्रेमींमध्ये तर आमदार लवू मामलेदार व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या घणाघाती भाषणात सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवत प्रा. वेलिंगकर म्हणाले की, भाजपने मातृभाषांची व गोव्यातील संस्कृतीची दैना केली आहे. तत्वांचे पालन करण्यासाठी गेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, त्याचा लाभ भाजपने फक्त सत्ता भोगण्यासाठी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. मगो पक्षाने भाजपबरोबरची युती तोडून स्वबळावर निवडणूक लढल्यास भाजपला पर्याय ठरणार असल्याचे सांगून सोमवारपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनावर भाभासुमंची कडवी नजर असेल असे वेलिंगकर म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर अरविंद भाटीकर, पांडुरंग नाडकर्णी, ऍड्. स्वाती केरकर, सुभाष देसाई, डॉ. केतन भाटीकर, जि. पं. सदस्य चित्रा फडते, आनंद शिरोडकर, नगरसेवक व्यंकटेश नाईक व परिसरातील सरपंच उपस्थित होते. मात्र, मंत्री दीपक ढवळीकर यांनी जाहीर सभेत काही वेळ उपस्थित राहून प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले. मडकई, प्रियोळ व फोंडा मतदारसंघातील सुमारे २ हजारहून अधिक भारतीय भाषाप्रेमी जाहीर सभेला उपस्थित होते.
आमदार लवू मामलेदार यांनी गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण गरजेचे असल्याचे सांगितले. मगो पक्ष समितीने भाभासुमंला पूर्ण पाठिंबा यापूर्वीच जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरविंद भाटीकर यांनी भाभासुमंला पाठिंबा दर्शवून गप्प राहणारे आमदार नको आहेत. सरकारी योजना बंद करून नव्या योजना सरकार सुरू करू शकते. मग इंग्रजीला दिलेले अनुदान सरकार का बंद करू शकत नाही? असा प्रश्‍ना केला.
सुभाष देसाई यांनी इंग्रजीला अनुदान देऊन कॉंग्रेसने पाप केले होते. आता सत्ताधारी भाजप सरकार महापाप करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे समाजाला जागृत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पांडुरंग नाडकर्णी व ऍड्. स्वाती केरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. आनंद वाघुर्मेकर यांनी प्रास्ताविक तर ऍड्. हृदयनाथ शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.