भाजपमध्ये प्रवेश नाहीच : विजय सरदेसाई

0
11

भाजपमध्ये प्रवेशाबाबत अफवा पसरविण्यात येत आहेत. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. आपला गोवा फॉरवर्ड हा प्रादेशिक पक्ष आहे. आपणाला कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करायचे असल्यास गोवेकरांना सांगून त्या पक्षात प्रवेश करणार आहे. चोरीछुपे कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून विजय सरदेसाई हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल हा खुलासा केला.

राज्य सरकारने मोठमोठे कार्यक्रम आयोजित करणे बंद करावे. राज्यात या कार्यक्रमांवर मोठा निधी खर्च होत आहे. त्यामुळे मतदारसंघांतील विकासकामांना निधीची कमतरता भासत आहे. राज्य सरकारवरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे, असा आरोप सरदेसाईंनी केला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी गुंडगिरी करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज्यातील बेरोजगारी, महागाई वाढली, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
राज्यातील पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. म्हादई प्रश्नी राज्य सरकार गंभीर नाही. म्हादई प्रवाहची एकही बैठक अजूनपर्यंत घेण्यात आलेली नाही, असेही सरदेसाई यांनी निदर्शनास
आणून दिले.