मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजपच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीला काल रवाना झाले आहेत.
नवी दिल्ली भेटीत काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन राज्यातील विकासकामांबाबत चर्चा करणार आहे. खाण व्यवसाय या विषयावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
भाजपच्या केंद्रीय पातळीवरील बैठकीला उपस्थित राहणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच, नवी दिल्लीत काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागून घेतली आहे. राज्यातील प्रलंबित खाण प्रश्नांवर चर्चा करून लवकर तोडगा काढण्याची विनंती केली जाणार आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राज्यातील विकासकामांच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या जास्तीत जास्त योजना लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कॅसिनोंच्या लॉकडाऊनमधील
शुल्काबाबत नंतर निर्णय
मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंच्या लॉकडाऊनमधील ७ महिन्याच्या काळातील शुल्काबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. कॅसिनोंच्या लॉकडाऊन काळातील सात महिन्यांच्या प्रलंबित शुल्काबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅसिनोंच्या लॉकडाऊन काळातील शुल्काबाबत चर्चा करण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर कॅसिनो व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून लॉकडाऊन काळातील सात महिन्यांच्या शुल्काबाबत नंतर निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे.