भाजपची तिसरी यादी आली; पण दक्षिण गोव्याची पाटी कोरी

0
6

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी नवी दिल्लीत काल जाहीर केली; मात्र तिसऱ्या यादीत देखील दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा कायम आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवाराच्या तिसऱ्या यादीत तामिळनाडू राज्यातील 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचे नाव निश्चितीवर भाजपच्या केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू
आहे.

भाजपच्या केंद्रीय समितीने संभाव्य महिला उमेदवारांची नावे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार, स्थानिक भाजप समितीने संभाव्य महिला उमेदवाराची नावे पाठवली. तसेच, काही संभाव्य महिला उमेदवारांच्या नावांचा विचार भाजपच्या केंद्रीय समितीकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून दक्षिण गोव्यात महिला उमेदवाराच्या नावाला पसंती दिली जाणार का? की पुरुष उमेदवाराला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर

नवी दिल्ली ः भाजपकडून काल उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये तामिळनाडूतील केवळ 9 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये तेलंगणाच्या राज्यपालपदी राहिलेल्या तमिलिसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत, त्यापैकी भाजप 29 जागांवर निवडणूक लढणार आहे. 10 जागा पीएमकेला दिल्या आहेत. पक्षाने आतापर्यंत 276 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
दक्षिण चेन्नईतून तमिलिसाई सुंदरराजन, मध्य चेन्नईतून विनोज पी. सेल्वम, वैल्लोरमधून ए. सी. शणमुगम, कृष्णागिरीतून सी. नरसिम्हा, नीलगिरीतून एल. मुरुगन, कोईंबतूरमधून के. अन्नामलाई, पेरंबलूरमधून टी. आर. पारिवेंधर, थूथुकुडीतून नयनार नागेंद्रन, कन्याकुमारी पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे.