भाजपचा जाहीरनामा २९ रोजी

0
71

>> प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांची माहिती

 

येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान समोर असलेला भाजपचा जाहीरनामा दि. २९ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी काल ही माहिती दिली. मात्र, जाहीरनाम्याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती जाहीरनामा तयार करण्याचे काम करीत आहेत. गेल्या महिन्यापासून हे काम सुरू आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या बैठका झाल्याचे तेंडूलकर यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या आश्‍वासनांपैकी ८० टक्के आश्‍वासने पूर्ण केली आहेत. काही कारणांमुळे बाकी राहिलेली यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येतील असे तेंडूलकर म्हणाले. पर्रीकर यांनी वास्को येथील सभेत मेट्रो ट्रेन सुरू करणे व प्रमुख शहरांतील बससेवा सुधारण्यावर जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

प्रचारासाठी भाजपच्या
व्हिडिओ व्हॅनचे उद्घाटन
हायटेक माध्यमातून निवडणूक प्रचार करण्यासाठी भाजप पूर्वीपासूनच सक्रीय असून काल भाजपने विधानसभा निवडणूक प्रचारासाठी व्हिडिओ व्हॅन सक्रीय केल्या. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल सकाळी भाजपच्या मुख्यालयासमोर झेंडा दाखवून या व्हॅनचे उद्घाटन केले. प्रचारासाठी आणलेल्या विसही व्हॅन अद्ययावत असून त्यावरील एलसीडी टी. व्ही. वरून भाजप सरकारने राबविलेल्या योजनांचा प्रचार सर्व मतदारसंघांमध्ये केला जाईल, असे सांगून भाजपने जनतेचा विश्‍वास जिंकल्याचे केंद्रीयमंत्री नाईक यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर राज्यात भाजपच सरकार स्थापन करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.