>> सदानंद शेट तानावडे यांची माहिती; महालक्ष्मी देवीच्या दर्शनाने होणार प्रारंभ
सत्ताधारी भाजप आज (मंगळवार, दि. 26) पासून आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. 2 मार्चला पहिल्या यादीत भाजपची उत्तर गोव्यातील उमेदवारी श्रीपाद नाईक यांना जाहीर झाली होती, तर पाचव्या यादीत दक्षिण गोव्यातील उमेदवारी सौ. पल्लवी धेंपो यांना जाहीर झाली. दोन्ही उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा शुभारंभ मंगळवारी होणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी दोन-दोन प्रचारप्रमुख यापूर्वीच नेमले आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध प्रचारावर पक्षाचा भर असणार आहे.
पक्षाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठीच्या उमेदवार पल्लवी धेंपो आणि उत्तर गोव्यासाठीचे उमेदवार श्रीपाद नाईक हे मंगळवारी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतील, असे तानावडे यांनी सांगितले. प्रचाराचा शुभारंभ दुपारी 3.30 वाजता होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘विकसित भारत’ योजना जनतेपुढे ठेवून हा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहनही पक्षाने केले आहे.
दोन्ही उमेदवार जाहीर होईपर्यंत भाजपने अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात केली नव्हती. आता उमेदवार जाहीर झाल्याने प्रचाराला वेग येणार आहे.
प्रचाराची धुरा कोणाच्या खांद्यावर?
भाजपने दक्षिण गोव्यातून प्रचार प्रमुख म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत व नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. कामत यांचा राजकारणातील दीर्घकालीन अनुभव पाहता पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
तसेच उत्तर गोव्यातून पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आणि साळगावचे आमदार केदार नाईक यांना प्रचार प्रमुख म्हणून नेमले आहे. खंवटे यांची देखील बार्देश तालुक्यावर चांगली पकड आहे, ते विचार घेत पक्षाने त्यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवली आहे.
पल्लवी धेंपोंनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन
भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो यांनी काल धूलिवंदनानिमित्त येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सौ. पल्लवी धेंपो यांना दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवारी रविवारी जाहीर केली. पणजी शिमगोत्सव समितीतर्फे धूलिवंदनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात सौ. पल्लवी धेंपो यांनी सहभाग घेतला, तसेच श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी सौ. पल्लवी धेंपो यांनी श्री महालक्ष्मी देवीला ओटी अर्पण केली. यावेळी पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो व इतर पदाधिकारी उपस्थित हेोते.
पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर दोन्ही जागांवर यश मिळणार
>> ॲड. सावईकर यांच्याकडून विश्वास व्यक्त
पक्षश्रेष्ठींनी दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर करून प्रथमच महिला उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे. आता प्रचाराला सुरुवात होणार असून, सर्व विधानसभा मतदारंसंघात भेट देऊन प्रचार केला जाणार आहे. दक्षिण गोव्यातून भाजपतर्फे पहिल्यांदाच महिला उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत असून, कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजप दोन्ही जागांवर नक्कीच यश संपादन करणार असल्याचा दृढविश्वास माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी काल फोंडा येथे व्यक्त केला. दरम्यान, नरेंद सावईकर हे सुद्धा दक्षिण गोव्यातील उमेदवारीसाठीच्या दावेदारांपैकी एक होते.
गोव्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मोदी यांनी मागील 10 वर्षांत गोव्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक मोठे प्रकल्प राज्यात मार्गी लागले, असेही सावईकर म्हणाले.
दक्षिण गोवा मतदारसंघातून अनेकांची नावे उमेदवारीसाठी पाठविण्यात आली होती; परंतु पक्षश्रेष्ठींनी सारासार विचार करूनच पल्लवी धेंपो यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे सावईकर म्हणाले.