बड्या राष्ट्रीय पक्षातर्फे दक्षिणेतून लोकसभा लढवणाऱ्या पल्लवी धेंपो पहिल्याच महिला

0
7

राज्यातील दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपसारख्या मोठ्या व राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या उमेदवारीवरून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय पक्षांनी दक्षिण गोवा मतदारसंघातून अद्यापपर्यंत महिलांना उमेदवारी दिलेली नव्हती. केवळ, प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारीवरून काही महिलांनी लोकसभेची निवडणूक लढविली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपने सौ. पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने दक्षिण गोव्यात महिला उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे.

भाजपने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कार्यवाही झालेली नाही, तरी देखील भाजपने दक्षिण गोव्यात महिलेला उमेदवारी जाहीर करून महिला आरक्षणाबाबत भाजप गंभीर असल्याचे संकेत दिले आहेत. गोव्याच्या 62 वर्षांच्या इतिहासात उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून संयोगिता राणे सरदेसाई या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या एकमेव महिला आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने 1980 मध्ये संयोगिता राणे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या रुपाने गोव्याला पहिल्या महिला खासदार मिळाल्या होत्या. त्यानंतर देखील संयोगिता राणे यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. पण त्या पुन्हा निवडून येऊ शकल्या नाहीत.

नंतरच्या काळात अन्य कुठल्याही महिलेला मोठ्या राजकीय पक्षांनी लोकसभेसाठी एकाही महिलेला संधी दिली नाही. आता, भाजपने दक्षिण गोव्यात सौ. पल्लवी धेंपो यांना प्रथमच संधी दिली आहे.