भाजपची नारीशक्ती

0
10

भारतीय जनता पक्षाने दक्षिण गोव्याची उमेदवारी पल्लवी धेंपो यांना जाहीर करून जणू नारीशक्तीचा गजरच केला आहे. दक्षिण गोवा मतदारसंघामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे आणि आजवरच्या एकाही निवडणुकीत त्या मतदारसंघातून महिला खासदार निवडून आलेली नाही. त्यामुळे भाजपश्रेष्ठींनी आजवर सक्रिय राजकारणात कधीही नसलेल्या, परंतु सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या धेंपो घराण्याच्या सुनेला उमेदवारी जाहीर करून विरोधकांना कोंडीत पकडले आहे. पल्लवी ह्यांच्या पाठीशी पती श्रीनिवास आणि समस्त धेंपो घराण्याची पूर्वपुण्याई उभी आहे. तीन पिढ्यांचे औद्योगिक साम्राज्य असूनही ह्या घराण्याने तळागाळाशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिलेली नाही आणि अडल्यानडलेल्यांना मदतीचा हात देण्यात कधीही आपपरभाव दाखवलेला नाही. श्रद्धाळू, नीतीमान आणि सदैव समाजाभिमुख असे हे दानशूर कुटुंब आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतपेढीपलीकडे असलेल्या मतदारांना, विशेषतः ख्रिस्ती समाजाला हे नाव जवळ आणू शकेल असा भाजपचा यामागील विचार दिसतो. केडरचा विचार केल्यास धेंपो कुटुंब हे त्यांनाही दूरचे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या उपक्रमांचे स्वतः श्रीनिवास धेंपो हे गेली अनेक दशके नेतृत्व करीत आलेले आहेत. मातृछायेसारख्या विहिंपच्या सामाजिक उपक्रमात त्यांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे तिन्ही त्यांच्यापाशी आहे. नुकत्याच झालेल्या अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास निमंत्रित करण्यात आलेल्या मोजक्या गोमंतकीयांमध्ये त्यांचाही समावेश होता. त्यामुळे आजवर राजकारणापासून हे कुटुंब दूर असले तरी संघपरिवारासाठी ते मुळीच परके नाही. स्वतः पल्लवी स्वतः प्रसिद्धीपासून सदैव कटाक्षाने दूर राहिल्या, परंतु शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्या आपल्या विवाहोत्तर जीवनात सदैव सक्रिय आहेत. गेल्यावेळी दक्षिण गोव्याची जागा भाजपला गमवावी लागली होती. मगो आणि भाजप त्यावेळी वेगवेगळे लढले होते, हेही त्यामागील एक प्रमुख कारण होते. परंतु यावेळी मगो भाजप एकत्र लढणार आहेत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बहुतेक आमदार भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ह्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप यावेळी करील. उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या फेरनिवडीबाबत पक्षामध्ये निश्चिंती दिसते, त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपले लक्ष यावेळी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात केंद्रित केलेले आहे, त्यामुळे तेथील निवडणूक ही वैयक्तिकदृष्ट्या त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निष्कारण काढल्या गेलेल्या कुरापतींमुळे दुखावलेला ख्रिस्ती समाज जवळ आणण्यासाठी त्यांना स्वीकारार्ह असलेल्या नव्या चेहऱ्याच्या शोधात भाजप होता आणि पल्लवी धेंपो यांच्या रूपाने त्यांना तो मिळाला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण गोव्यातील सारी राजकीय समीकरणे पालटली आहेत. त्यांच्या रूपाने स्वच्छ, नवा चेहरा रिंगणात उतरल्याने त्यांची भांडवलदार घराण्याची पार्श्वभूमी आणि उच्चवर्णीयत्व हे मुद्दे काँग्रेस पुढे आणू पाहत असल्याचे दिसते, परंतु तसे करणे हे काँग्रेससाठी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणारे ठरेल. धेंपो उद्योगसमूहाने भांडवलदारी वृत्ती कधीही दाखवलेली नाही आणि त्यांच्यावर तसा आरोप करणारेच त्यामुळे तोंडघशी पडतील. दुसरे म्हणजे जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणाचा आग्रह धरणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक आहे आणि गेल्या काही निवडणुकांमधून जातीपातीचे राजकारण खेळणाऱ्या राजकीय पक्षांचे राज्याराज्यांतून पानीपत झाले आहे, ह्याचे भान काँग्रेस नेतृत्वाने यावेळी ठेवल्यास बरे होईल. अल्पसंख्यक मतदार हे काँग्रेसचे ह्या निवडणुकीतले आशास्थान होते, परंतु धेंपो यांच्या उमेदवारीमुळे हा वर्ग काँग्रेसच्या पारड्यात एकगठ्ठा मते घालण्याची शक्यता आता उरलेली नाही. रेव्हल्युशनरी गोवन्सने दोन्ही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार स्वतंत्रपणे उतरवले आहेत. आरजी काँग्रेसच्या पारंपरिक मतांना खिंडार पाडतो हे आजवर दिसून आलेले आहे, त्यामुळे त्याचा लाभ भाजपला मिळू शकतो. मोदींचे नेतृत्व, भाजपचे संघटनात्मक बळ आणि धेंपो घराण्याची पुण्याई पल्लवी यांच्यापाशी आहे. गरज आहे ती हाताशी असलेल्या मोजक्या वेळेत मतदारांशी नाते जोडण्याची. पल्लवी यांना गेली किमान सोळा वर्षे आम्ही अगदी जवळून ओळखतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास आणि अभ्यास यात त्या मागे हटणाऱ्या नाहीत. त्यामुळे एकदा रणांगणात उतरल्यानंतर त्या हे आव्हान स्वीकारतील आणि विरोधकांना आव्हान बनतील हे निःसंशय!